जितेंद्र जाधव, बारामती 23 जानेवारी : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सींग द्वारे बारामती, गडचिरोली, हिंगोली, नांदेड, नंदुरबार इथल्या पोलिंग बुथ प्रमुखांशी संवाद साधला. यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांच्याबद्दल टिप्पणी करत काँग्रेसवर हल्ला बोल केला. मेरा बुथ, सबसे मजबुत या उपक्रमात ते बोलत होते.
पंतप्रधान मोदी म्हणाले, "आपल्याला शरद पवारांबद्दल व्यक्तिगत आदर आहे, मात्र काँग्रेसमध्ये असतना पवारांनी जेव्हा अध्यक्ष पदासाठी प्रयत्न केला तेव्हा काँग्रेसने त्यांचा अपमान करत बाहेरचा रस्ता दाखवला. ज्या काँग्रेसने त्यांना पक्षबाहेर काढले त्याच काँग्रेस सोबत आज पवार साहेब पुन्हा गेले याचा खेद वाटतो." असं सांगत त्यांनी काँग्रेसला धारेवर धरलं.
आपल्या संवादाची सुरवात मराठीतून करत मोदी यांनी बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केलं. सरकारने बाळासाहेबांच्या स्मारकासाठी 100 कोटी रुपये मंजूर केले आहेत अशी माहितीही त्यांनी दिली. आज एक ट्विट करूनही त्यांनी बाळासाहेबांना आदरांजली अर्पण केली होती.
मोदींनी काँग्रेस वर निशाणा साधत शरद पवार यांच्या बद्दल सहानुभूती दाखवल्याने एका दगडात दोन पक्षी मारल्याची चर्चा होती. यावेळी भाजपाचे मंत्री गिरीश बापट यांच्या सह महत्त्वाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
शरद पवार आणि पंतप्रधान मोदी यांची केमिस्ट्री सर्वांनाच माहित आहे.
मोदी बारामतीत दोन वेळा येऊनही गेले आहेत. त्यामुळे ते पवारांवर टीका करतील अशी अपक्षाही कुणाला नव्हती. त्या प्रमाणेच मोदींनी पवारांवर थेट टीका न करता त्यांना फक्त त्यांच्या काँग्रेसमध्ये झालेल्या अपमानाची आठवण करुन दिली.
Having a great interaction with Karyakartas from Maharashtra. Watch. https://t.co/GOLEXovUEJ
— Narendra Modi (@narendramodi) January 23, 2019