नवी दिल्ली, 20 नोव्हेंबर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. संसद भवनात आज दुपारी साडेबारा वाजता ही भेट होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात ओल्या दुष्काळाने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार हे पंतप्रधान मोदींची भेट घेऊन त्यांना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत माहिती देण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रात यंदा परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला. यामध्ये शेतकऱ्यांनी मोठ्या मेहनतीने वाढवली पिकं जमीनदोस्त झाली. त्यामुळे बळीराजा सध्या मदतीच्या प्रतिक्षेत आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीत होत असलेली मोदी-पवार भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील सर्वपक्षीय शिष्टमंडळदेखील नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे. यावेळी राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने मदत करावी, अशी मागणी शिष्टमंडळाकडून करण्यात येणार आहे.
दरम्यान, एकीकडे पावसामुळे झालेल्या नुकसानामुळे शेतकरी चिंतेत असताना महाराष्ट्रातील सत्तास्थापनेचा तिढा मात्र सुटता सुटेना असं चित्र आहे. राज्यात सत्तास्थापनेसाठी विलंब होत असल्याने शिवसेनेच्या आमदारांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. फक्त आमदारच नाही तर कार्यकर्तेही संभ्रमावस्थेत आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नुसत्या चर्चाच सुरू असल्याने शिवसेनेची चिंता वाढली आहे. भाजपशी काडीमोड घेतल्यानंतर शिवसेनेने राष्ट्रवादीच्या माध्यमातून काँग्रेसची चर्चा सुरू केली. या जुळवाजुळवीलाही आता अनेक दिवस होत असल्याने शिवसेनेचा मुख्यमंत्री करण्याचं उद्धव ठाकरे यांचं स्वप्न केव्हा पूर्ण होणार असा प्रश्न आता सेनेतूनच विचारला जातोय. दररोज फक्त बैठका होत असल्याने त्यातून काहीही निघत नाहीये. या सगळ्या पार्श्वभूमीवर हाता तोंडाशी आलेला घास जातोय की काय अशी परिस्थिती निर्माण झालीय. त्यामुळे उद्धव ठाकरे सगळ्यांशी चर्चा करणार आहेत.
VIDEO : पोशिंद्याला जेसीबीनं चिरडलं, तर दुसरीकडे म्हशीला दिलं जीवदान
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा