नवी दिल्ली, 25 डिसेंबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते आज किसान सन्मान निधीचे (pm kisan samman nidhi 2020) वाटप करण्यात आले आहेत. यावेळी पंतप्रधानांनी देशभरातील शेतकऱ्यांशी संवाद साधत आहे. यावेळी महाराष्ट्रातील लातूरच्या शेतकऱ्याशी संवाद साधला. त्यावेळी लातूरच्या शेतकऱ्याने खास महाराष्ट्रीयन स्टाइलमध्ये रामराम ठोकला.
भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्तानं नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते किसान सन्मान निधी वाटप करण्यात आला. एका विशेष बटणच्या मदतीने 9 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 2 हजार रुपये जमा करण्यात आले आहे. यावेळी पंतप्रधान मोदींनी देशभरातील वेगवेगळ्या कोपऱ्यातील शेतकऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. यावेळी महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील शेतकरी गणेश राजेंद्र भोसले यांच्याशी संवाद साधला.
यावेळी, पंतप्रधानांनी नमस्ते म्हणत गणेश भोसले यांना साद घातली, त्यावर गणेश भोसले यांनी रामराम पंतप्रधान साहेब म्हणत बोलण्यास सुरुवात केली. त्यानंतर मोदींनीही रामराम म्हणत बोलण्यास सुरुवात केली.
'मी माझ्या शेतात सोयाबीनचे पिक घेतले होते. माझाकडे 9 गायी आणि म्हशी आहे. अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टीमुळे नुकसान झाले होते, अशी व्यथा भोसले यांनी मांडली.
'शेतीमध्ये जास्त पैसा येतो की पशुपालनमधून येतो? असा सवाल मोदींनी विचारला. त्यावर भोसले म्हणाले की, 'शेतीमध्येही पैसा येतो. पण गायी आणि म्हशीचे दूध विक्री करूनही जास्त पैसा मिळतो. मागील वर्षी सोयाबीन पिकाचे नुकसान झाले. पंतप्रधान किसान पिक योजनेचा मी फायदा घेतला होता. मी अडीच हजार रुपये भरले होते. मला 54 हजारांचा परतावा मिळाला होता' असं भोसले यांनी सांगितलं. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत बीडचे शेतकरी सहभागी
दरम्यान, बीड जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाच्या वितरण कार्यक्रमाचे लाईव्ह प्रक्षेपण करण्यात आले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांसोबत संवाद साधला. या कार्यक्रमात भाजप खासदार डॉ प्रीतम मुंडे सहभागी झाल्या होत्या. यावेळी बीडमधील अनेक लोकप्रतिनिधी व जिल्ह्यातील शेतकरी देखील सहभागी झाले होते. देशाच्या कानाकोपऱ्यातील शेतकऱ्यांचे पंतप्रधानांनी संवाद साधला शेतकरी कायद्यासंदर्भात शेतकऱ्यांच्या समस्या अडचणी शंकाचे निरसन नरेंद्र मोदी यांनी केले.