पैशासाठी कातळावर वृक्षलागवडीचा 'त्यांनी' केला फार्स; कोट्यावधींचा भ्रष्टाचार उघड

पैशासाठी कातळावर वृक्षलागवडीचा 'त्यांनी' केला फार्स; कोट्यावधींचा भ्रष्टाचार उघड

पाण्यासाठी वणवण भटकावं लागत असताना बीडमधील राज्यकर्त्यांनी आपले 'हात ओले' करून घेण्याचा सपाटा लावला आहे. त्यासाठी बीड पंचायत समितीतील राज्यकर्त्यांनी चक्क खडकावरतीच वृक्ष लागवडीचा घाट घातला. यात कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाल्याचे आरोप होत आहेत.

  • Share this:

सुरेश जाधव

5 फेब्रुवारी, बीड : ‘जनता उपाशी राज्यकर्ते तुपाशी’ अशी परिस्थिती सध्या बीडमध्ये आहे. पाण्यासाठी वणवण भटकावं लागत असताना बीडमधील राज्यकर्त्यांनी आपले 'हात ओले' करून घेण्याचा सपाटा लावला आहे. त्यासाठी बीड पंचायत समितीतील राज्यकर्त्यांनी चक्क खडकावरतीच वृक्ष लागवडीचा घाट घातला आहे. पण, न्यूज18 लोकमतनं मात्र अधिकाऱ्यांच्या संगनमतानं सुरू असलेल्या या घोटाळ्याला वाचा फोडली आहे. त्यामुळे भ्रष्ट अधिकाऱ्याचं आणि राज्यकर्त्यांचं पितळ उघड पडलं आहे.

दुष्काळानं कबंरडं मोडलेलं असताना पिण्याच्या पाण्यासाठी देखील वणवण भटकावं लागत आहे. दावणीची जनावरं खाटिकाला देण्याची वेळ आली. पण, अशा गंभीर परिस्थितीमध्ये मात्र राज्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांच्या संगनमतानं चक्क खडकावरच वृक्ष लागवडीचा घाट घातला.

पिण्याच्या पाण्यासाठी होणारी पायपीट पाहता लावलेली झाडं जगणार तरी कशी? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.

आजघडीला जवळपास 80 गावांमध्ये वृक्ष लागवड करण्यात येत आहे. सध्या लागवड झालेल्या झाडांपैकी अर्ध्यापेक्षा जास्त झाडे वाळली आहेत. हा सारा प्रकार पाहिल्यानंतर महिन्याभरापूर्वी लावलेली झाडं वाळून जात असताना नव्या कामाला परवानगी का? असा सवाल सध्या बीडकर करत आहेत.

या साऱ्या प्रकरणावर बोलताना, "गावांमध्ये सध्या टँकरनं पाणीपुरवठा केला जात आहे. माणसांना पाणी मिळत नसताना झाडं कशी जगवणार? त्यामुळे वृक्ष लागवडीची कामं तात्काळ थांबवावीत आणि सीईओंनी यामध्ये लक्ष घालावे", अशी मागणी पंचायत समिती सदस्य ऊत्रेश्वर सोनवणे यांनी केली आहे.

"आम्ही बीडीओंकडे या साऱ्या प्रकरणाची चौकशीची मागणी केली. पण, त्यांनी रजिस्टर उपलब्ध नसल्याचं कारण दिलं. हा सारा घोटाळा करोडो रूपयांचा असून केवळ कार्यकर्ते पोसण्यासाठी हा वृक्ष लागवडीचा घाट घातला गेला आहे. त्यामुळे सीईओंनी यामध्ये लक्ष घालून कामाला स्थिगिती द्यावी, " अशी मागणी बीडकर बळीराम गवते यांनी केली आहे.

वृक्ष लागवडीमध्ये घोटाळा असल्याचा आरोप होत असताना उपसभापतींनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे या साऱ्या प्रकरणामध्ये गौडबंगाल नक्की आहे, हे बीडकरांना अजून उलगडलेलं नाही. अधिकाऱ्यांनी मात्र 'आळी मिळी गुप चिळी' अशीच भूमिका या साऱ्या प्रकरणामध्ये घेतली आहे. दरम्यान, काही गावच्या सरपंचांनी चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.

दरम्यान, "वृक्ष लागवडीची वर्क ऑर्डर ही यापूर्वीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी दिलेली आहे. त्यामुळे यामध्ये मी हस्तक्षेप करू शकत नाही" ,अशी प्रतिक्रिया गटविकास अधिकारी आर. जी. शिनगारे यांनी दिली आहे.

300 टँकरनं पाणी पुरवठा

दुष्काळानं होरपळून जात असलेल्या बीड जिल्ह्यामध्ये सध्या 300 टँकरनं पाणी पुरवठा केला जात आहे. अशी स्थिती असताना देखील मागील दोन महिन्यामध्ये पंचायत समितीनं 177 नवीन कामांना मंजुरी दिली आहे. पाणीच नाही तर वृक्ष लागवड करून साध्य तरी काय होणार? अशी स्थिती असताना हा सारा प्रकार म्हणजे 'मेल्याच्या टाळू वरचं लोणी खाण्यासारखंच'!

VIDEO : रस्ता ओलांडणाऱ्या चिमुरडीला भरधाव कारने उडवलं

First published: February 5, 2019, 8:45 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading