Home /News /maharashtra /

पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीने आणखी एक शिलेदार गमावला, अजित पवारांच्या निकटवर्तीयाचं निधन

पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीने आणखी एक शिलेदार गमावला, अजित पवारांच्या निकटवर्तीयाचं निधन

शेख हे राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय म्हणूनही परिचित होते.

पिंपरी चिंचवड, 31 जुलै : पिंपरी चिंचवड महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) आणखी एका नगरसेवकाचं आज निधन झालं आहे. जावेद शेख असं आज निधन झालेल्या नगरसेवकाचं नाव आहे. शेख हे राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय म्हणूनही परिचित होते. जावेद शेख यांना 16 जुलै रोजी कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांच्यावर उपचार करण्यात आले. उपचारानंतर केलेल्या चाचणीनुसार त्यांचा कोरोनाचा अहवाल निगेटीव्ह आला होता. मात्र त्यांची प्रकृती अतिशय खालावली होती. शिवाय ते किडनीच्या आजारानेही त्रस्त होते. त्यामुळे त्यांना तातडीने पुण्यातील खासगी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. मात्र आज संध्याकाळी उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. जावेद शेख पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत सलग तीन वेळा राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले होते. दरम्यान, याआधी देखील काही दिवसांपूर्वीच कोरोनाची लागण झाल्याने उपचार सुरू असताना हृदय विकाराचा झटका आल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक दत्ता काका साने यांचं निधन झालं होतं. तर आज शेख यांच्या निधनाने धडाडीचे दोन शिलेदार गमावल्याचं शोक व्यक्त करत शहर राष्ट्रवादीने त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. तर आयुक्त श्रावण हर्डीकर यांनाही या घटने संदर्भात दुःख व्यक्त केलं आहे. शेख यांच्या निधनामुळे शहरात हळहळ व्यक्त होत आहे.
Published by:Akshay Shitole
First published:

Tags: NCP, Pimpari chinchavad

पुढील बातम्या