पिंपरी चिंचवड, 1 मार्च : अल्पवयीन मुलीचं अपहरण करण्याचा प्रयत्न करत तीन नराधमांनी तिचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना पिंपरी चिंचवड शहरात घडली आहे. कैलास विटकर, राहुल धोत्रे आणि अजय शिंदे अशी आरोपींची नावे असून यातील एका आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश मिळालं असून इतर दोन आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.
निगडी परिसरातील एक 13 वर्षीय मुलगी प्रोजेक्ट पेपर आणण्यासाठी एका दुकानात एकटीच गेली होती. तिथून परतत असताना कैलास विटकर नामक नराधमाने आपल्या राहुल धोत्रे आणि अजय शिंदे नामक मित्रांसोबत तिला रिक्षात ओढलं आणि तिच्या आईला जीवे मारण्याची धमकी देत तिचा विनयभंग करून तिला रिक्षातून ढकलून दिलं.
भेदरलेल्या मुलीने घडलेला प्रकार तिच्या आईला सांगितला. त्यानंतर पीडित मुलीच्या आईने पोलिसांकडे तक्रार केली आणि हा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी तात्काळ गुन्ह्याची नोंद करत या प्रकरणातील एका आरोपीला अटक केली आहे. तर इतर दोघांनाही लवकर अटक करण्यात येईल असंही पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.
हेही वाचा- वडिलांची हत्या करून 10 वीतील मुलाने घरातच पुरला मृतदेह, 2 महिन्यांनंतर झाला उलगडा
दरम्यान, पिंपरी चिंचवड शहरात गेल्या काही वर्षांमध्ये गुन्हेगारीत मोठी वाढ झाली आहे. अशातच अल्पवयीन मुलीवर झालेल्या विनयभंगाच्या या घटनेनंतर पिंपरी चिंचवड शहरातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.