पिंपरी चिंचवड, 2 मार्च : रक्षकच जेव्हा भक्षक होतात, तेव्हा सामान्य माणसांनी न्याय कुणाकडे मागायचा असा प्रश्न निर्माण होतो. असाच काहीसा प्रकार पिंपरी चिंचवड मध्ये घडला आहे. गृहरक्षक दलातील दोन जवानांनी पोलीस असल्याचं सांगत अनेकांना लुटल्याचं प्रकरण समोर आलं आहे.
आशिष खरात आणि मिलिंद सूर्यवंशी या दोघांनी आपण पोलीस असल्याचा धाक दाखवत अनेकांना हातोहात लुटलं आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांनी एका कामगार तरुणालाही लुटलं. मात्र तरुणाने धाडसाने पुढे येऊन पोलिसांकडे तक्रार केली आणि हे दोघेजण पोलिसांच्या जाळ्यात अडकले.
धक्कादायक बाब म्हणजे पोलिसांप्रमाणेच सामान्य नागरिकांचं रक्षण करण्यासाठी उभारण्यात आलेल्या होमगार्ड म्हणजेच गृहरक्षक दलात हे दोघे कार्यरत आहेत. मात्र पैश्याच्या लालसेपोटी सराईत गुन्हेगारही लाजतील असं कृत्य या दोघांनी केलं आहे. तक्रार दाखल होताच या प्रकरणी पोलिसांनी आपली भूमिका चोखपणे बजावली. पण तरीही हे कृत्य करणाऱ्या या दोघांना किंवा असेच गुन्हे करणाऱ्या इतर गुन्हेगारांना पोलिसांचा धाक नव्हता, हे पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे.
सामान्य माणसाच्या दुबळेपणाचा फायदा घेत या दोघांनी केलेल्या कृत्याची शिक्षा म्हणून अशा आरोपींवर कठोरातील कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आता सर्वसामान्य नागरिकांकडून समोर येत आहे.