Home /News /maharashtra /

पोलिओ लस देताना प्लॉस्टिकचा तुकडा गेला बाळाच्या पोटात, यवतमाळनंतर पंढरपूरमध्येही धक्कादायक प्रकार

पोलिओ लस देताना प्लॉस्टिकचा तुकडा गेला बाळाच्या पोटात, यवतमाळनंतर पंढरपूरमध्येही धक्कादायक प्रकार

बाळाला लस देत असताना ड्रॉपच्या बाटलीचा प्लास्टिकचा तुकडा सुद्धा बाळाच्या तोंडात गेला. त्यामुळे आता बाळाची प्रकृती खालावली आहे.

पंढरपूर, 02 फेब्रुवारी : यवतमाळमध्ये पोलिओ लस देण्याऐवजी सॅनिटायझर देण्यात आल्याची धक्कादायक घटना ताजी असताना पंढरपूरमध्येही धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिओ लस लहान बाळाला देताना ड्ऱॉपसोबत प्लास्टिकचा तुकडा सुद्धा बाळाच्या पोटात गेला आहे. त्यामुळे बाळाला दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. पंढरपूर तालुक्यातील भाळवणी प्राथमिक आरोग्य केंद्रात ही घटना घडली आहे. 31 जानेवारी रोजी पोलिओ लसीकरणाची मोहिम राज्यात राबवण्यात आली होती. भाळवणी प्राथमिक आरोग्य केंद्रात मात्र लस देत असताना    आरोग्य कर्मचाऱ्याचा हलगर्जीपणा समोर आला आहे. रविवारी सोलापूर जिल्ह्यात पोलिओ लस देण्यासाठी आरोग्य विभागाने प्राथमिक आरोग्य केंद्रासह अंगणवाड्यामध्ये लसीकरणाची सोय केली होती. सकाळी भाळवणी इथं राहणारे माधुरी व त्यांचे पती बाबा बुरांडे हे आपल्या एक वर्षाच्या बाळाला पोलिओची लस देण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात घेवून आले होते.    बाळाला लस देत असताना ड्रॉपच्या बाटलीचा प्लास्टिकचा तुकडा सुद्धा बाळाच्या तोंडात गेला. त्यामुळे आता बाळाची प्रकृती खालावली आहे. बाळाला तातडीने उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले आहे. सध्या डॉक्टरांनी बाळाला औषध दिले असून दोन दिवसांनी पुन्हा तपासणी केली जाणार आहे. दरम्यान, झालेल्या या प्रकाराबद्दल पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे. दरम्यान, यवतमाळ जिल्ह्यातील  घाटंजी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कापसी कोपरी इथं सुद्धा असाच धक्कादायक प्रकार घडला होता.  पोलिओ लसीकरणादरम्यान लहान मुलांना सॅनिटायझर पाजण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. 1 ते 5 वयोगटातील मुलांना पोलिओची लस देण्यात आली होती. अचानक मुलांना उलट्याचा त्रास सुरू झाला. त्यामुळे एकच गोंधळ उडाला होता. त्यामुळे12  बालकांना तातडीने यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये दाखल केले आहे.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या