रत्नागिरी, 12 मे : मुंबईतून पायपीट करत आपल्या गावी पोहोचलेल्या लोकांमुळे रत्नागिरी जिल्ह्यात धोका वाढला आहे. मुंबईहून येणाऱ्या कोरोना रुग्णांच्या संख्येत रोज वाढ होत असल्यामुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचं रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केलं आहे.
सोमवारी दिवसभरात कोरोनाचे आणखी पाच रुग्ण आढळल्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 47 वर पोहोचला आहे. आढळलेल्या पाच नव्या रुग्णांमध्ये तीन रत्नागिरी शहरातल्या तर लांजा तालुक्यातल्या 9 आणि 10 वर्षाच्या दोन मुलांचा समावेश आहे . त्यामुळे शहरातही कोरोनाचा प्रवेश झाल्यामुळे काही परिसर सील करण्यात आले आहेत.
हेही वाचा - पुणे पालिका अधिकारी मेटाकुटीला; 5 स्टारमधील क्वारंटाईन नागरिकांमुळे उडाली झोप
तर दुसरीकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यातही वाशीतून आलेल्या एका महिलेचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे सिंधुदुर्गची रुग्णसंख्या आता पाच झाली आहे. एकीकडे असे रुग्ण वाढत असताना मुंबईहून कोकणात येणाऱ्याना क्वारंटाइन करुन आवश्यक त्यांच्या चाचण्या घेण्यासाठी आधीच अपुरी क्षमता असलेल्या प्रशासनावर प्रचंड ताण पडू लागला आहे.
दरम्यान, सोमावारी सायंकाळी 7 जणांचे तपासणी अहवाल प्राप्त झाले असून यातील 5 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर 1 अहवाल निगेटिव्ह आला आहे आणि एक अहवाल अपुरा नमुना असल्याने प्राप्त होऊ शकला नाही.
हेही वाचा - लक्षणं नाहीत तरी 7 टेस्ट पॉझिटिव्ह; कोरोनाग्रस्तांच्या डिस्चार्ज नियमांवर प्रश्न
आढळलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये 2 रुग्ण शहरातील नर्सिंग सेंटरमध्ये काम करणारे कर्मचारी आहेत. तर एक रुग्ण रत्नागिरी परिसरातील येथील रहिवासी आहे. यामुळे जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 47 वर पोहोचली आहे.
संपादन - सचिन साळवे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.