अहमदनगर, 21 सप्टेंबर: जोरदार पावसामुळे नगर तालुक्यातील अरणगाव येथील तलाव फुटल्याने वाळुंज य इथे पूर आला होता. या पूराच्या पाण्यात परीट वस्तीतील 3० जण अडकले होते.या 30 जणांना वाचवण्यात आपत्ती व्यवस्थापनाच्या बचाव कार्याला मोठं यश आलं आहे.
सकाळपासूनच जोरदार पाऊस सुरू झाल्याने तलाव ओव्हरफ्लो झाला़ तसेच वस्तीच्या चारही बाजूने पाण्याने वेढा दिल्याने ग्रामस्थांना बाहेर पडता आले नाही़ त्यातच तलावाचे पाणीही वस्तीपर्यंत पोहोचल्याने अनेक घरे पाण्याखाली गेली. त्यामुळे काही ग्रामस्थ उंचावर तर काहींना घराच्या छताचा आधार घ्यावा लागला़ या पूराची माहिती मिळताच तहसीलदार सुधीर पाटील, पोलीस पथक, आर्मी पथक घटनास्थळी दाखल झाले़ रात्री उशिरापर्यंत पाण्यात अडकलेल्या ग्रामस्थांना बाहेर काढण्याचे काम सुरू होतं. घटनेचं गांभीर्य पाहून पुणे येथील राष्ट्रीय आपत्ती सहाय्यता पथकाला बोलवण्यात आलं. मात्र रात्री उशिरापर्यंत हे पथक दाखल न झाल्याने ग्रामस्थ पाण्यातच अडकून पडले होते़
या घटनेची माहिती मिळताच तहसीलदार सुधीर पाटील घटनास्थळी दाखल झाले़ मात्र ग्रामस्थ ४०० ते ५०० मीटर अंतरावरील पाण्यात अडकल्याने तिथपर्यंत पथकाला पोहोचता येत नव्हते़ त्यामुळे आर्मी पथकाला बोलविण्यात आले़ सायंकाळी ४० सैनिकांची तुकडी घटनास्थळी दाखल झाली मात्र त्यांनाही वस्तीपर्यंत पोहोचणे शक्य झाले नाही़ त्यामुळे रात्री दहा वाजेच्या सुमारास राष्ट्रीय आपत्ती सहाय्यता पथकाला बोलावण्यात आले होते़ रात्रभर बचाव कार्य सुरू होते. अख अखेर पहाटेच्या सुमारास अडकलेल्या १५ पुरुष १४ महिला आणि १ लहान मुलगा यांना बाहेर काढण्यात राष्ट्रीय आपत्ती साहाय्यता पथकाला यश आलं.