'या' गावातली लोकं करतात कुत्र्याची पूजा, कारण ऐकून तुम्हालाही वाटेल कौतुक!

'या' गावातली लोकं करतात कुत्र्याची पूजा, कारण ऐकून तुम्हालाही वाटेल कौतुक!

एखाद्या प्राण्याचं मंदिर अथवा त्याचं स्मरण करण्याच्या घटना अत्यंत दुर्मिळ आहेत. चिखली गावातली ही परंपरा देखील त्यापैकीच एक आहे

  • Share this:

स्वप्निल घाग, प्रतिनिधी

रत्नागिरी, 01 जानेवारी : थर्टी फस्टचं सेलिब्रेशन म्हटलं दारू पार्ट्या आणि डीजेच्या तालावर ठेका धरून बेधुंद नाचणे, हे जणू समिकरणच बनलंय. परंतु, काही लोकं याला अपवाद ठरतात. असंच एक गाव आहे जिथे न चुकता दरवर्षी सगळे गावकरी हे एका कुत्र्याची पूजा करतात आणि त्याच्या कामाचं स्मरण करतात. तुम्हाला हे ऐकून धक्का बसेल, पण हे सत्य आहे.

हे मंदिर कुठल्या देव देवतांचं नाही. वा कुठल्या साधुसंताची समाधी,किंवा कुठल्या स्वतंत्र्य सैनिक आणि नेत्यांचं स्मारकंदेखील नाही. हे मंदिर आहे एका प्रामाणिक कुत्र्याचं होय...एका कुत्र्याचं.

कोणे एकेकाळी एका कुत्र्याने (ज्याला त्या काळी बाल्या या नावाने लोकं हाक मारत.)  गावच्या ग्रामस्थांसह, त्यांची जनावरे आणि घरांचं रक्षण केलं. त्याच्या या रक्षणाप्रती कृतज्ञता दाखवत चिखली गावातली चांदीवडे वाडीतले ग्रामस्थ आजही त्याची देव म्हणून पूजा करतात. एवढंच नव्हे तर दर वर्षाच्या 1 जानेवारीला संपूर्ण दिवस त्याच्या स्मरणात अबालवृद्ध एकत्र येऊन त्याच्या शौर्याचे आणि प्रामाणिकपणाचे गुणगान गाताना दिसतात.

चिपळूणहुन गुहागरला जाताना चिखली गावातल्या रस्त्याच्या लगत बाल्या कुत्र्याचं मंदिर इथल्या ग्रामस्थांनी सामूहिकरित्या बांधलं आहे. त्यात बाल्याची चांदीची मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे. चांदीवडे वाडीतील ग्रामस्थ नियमितपणे या मंदिरातील मूर्तीची न चुकता नियमित पूजा देखील करतात.

असा होता बाल्या!

काही वर्षांपूर्वी जेव्हा गावाच्या भोवती घनदाट जंगल होतं त्यावेळी  बाल्या गावातल्या जनावरांसह इथल्या ग्रामस्थांचं जंगली हिंस्त्र प्राण्यांपासून संरक्षण करत असे अशी माहिती इथले जाणकार सांगतात. एखाद्या सिनेमात जसा गळ्यात सामानाची यादी टाकली की कुत्रा वाण-सामान घरपोच करतो. त्याप्रमाणे बाल्या चांदीवडे परिवारातल्या लोकांचं साहित्य आणून देत असे असंही सांगितलं जातंय. शिवाय रात्रीच्या वेळी संपूर्ण वाडी निद्रिस्त असताना बाल्या मात्र, खडा पहारा देत असे, अशी आख्यायिका आहे.

बाल्याचं मंदिर तोडणार!

गुहागर विजापूर महामार्गाचे काम पुढील काळात सुरू होणार आहे. ज्यात बाल्याचं मंदिर देखील तोडावे लागणार आहे. असं असतानाही गावच्या लोकांनी मात्र त्याला विरोध न करता ते मंदिर दुसऱ्या जागी बांधून मिळावं, अशी विनंती राष्ट्रीय बांधकाम विभागाकडे केली आहे.

एखाद्या प्राण्याचं मंदिर अथवा त्याचं स्मरण करण्याच्या घटना अत्यंत दुर्मिळ आहेत. चिखली गावातली ही परंपरा देखील त्यापैकीच एक आहे. विशेष म्हणजे, आजचा तरुण वर्ग देखील बाल्या कुत्र्याचं स्मरण करून नव्या वर्षाची सुरवात करण्याची परंपरा जपताना दिसत आहे.

आजच्या विज्ञान युगात प्राणमिकपणा हा दुरापास्त झालाय हे सांगण्यासाठी कुठल्या संशोधकाची गरज नाही. मात्र, 60/70 वर्षांपूर्वी एका कुत्र्याने केलेल्या उपकाराची जाण ठेवत त्याला जंगल देवाचा दर्जा देऊन कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या चांदीवडे वाडीतील ग्रामस्थांचा प्रामाणिकपणा अनेकांसमोर आदर्श ठेवणार असा आहे.

Published by: sachin Salve
First published: January 1, 2020, 7:19 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading