जळगाव,ता.14 जून : सवर्णाच्या विहिरीत पोहल्याने मुलांची धिंड काढण्या प्रकरणी पोलिसांमध्ये तक्रार दाखल करणाऱ्या पालकांवर तक्रार मागे घेण्यासाठी दबाव वाढत आहे.
मात्र सरकार खंबीरपणे पालकांच्या बाजूने राहिल असं आश्वासन पालकमंत्री गिरीष महाजन यांनी दिलं आहे.
या प्रकरणी आरोपींना कठोरात कठोर शिक्षा होईल याची काळजी घेऊ असं आश्वासन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलं. हे प्रकरण सवर्ण किंवा दलित असं नसून आरोपी हेही अनुसूचित जमातींमधले आहेत अशी माहितीही चंद्रकांत पाटील यांनी दिली. समाजातील ही विकृती असून सर्वांनी मिळून अशा विकृतीविरूद्ध लढायला पाहिजे असंही पाटील म्हणाले.
जामनेर तालुक्यातल्या वाकडी गावातली ही घटना आहे. रविवारी ही मातंग समाजाची दोन मुलं पोहण्यासाठी विहिरीत उतरली होती. ईश्वर बळवंत जोशी यांच्या शेतातील विहीरीवर ते गेले होते. या शुल्लक कारणांवरून ईश्वर बळवंत जोशी व प्रल्हाद उर्फ सोन्या लोहार या दोघांनी या दोन मुलांच्या अंगातील कपडे काढून नग्न केले व त्यांना पट्याने जबर मारहाण केली.
एवढ्यावरच न थांबता त्यांची धिंडही काढली आणि घटनेचा व्हिडीओ काढून तो व्हायरल केला. हा व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या आरोपीलाही पोलिसांनी अटक केली आहे.