परभणी, 11 जानेवारी : कोरोनाशी सामना करणाऱ्या महाराष्ट्रासमोर ( maharashtra)आता बर्ड फ्लूचे (Bird Flu) संकट येऊन उभे ठाकले आहे. परभणीमधील मुरुंबा गावात 800 कोंबड्यांचा मृत्यू हा बर्ड फ्लूमुळे झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यानंतर आता परभणीमध्ये संध्याकाळपर्यंत 10 हजार कोंबड्या नष्ट करण्यात येणार आहे.
पंजाब, राजस्थान, हरियाणामध्ये बर्ड फ्लूची लाट आता महाराष्ट्रात धडकल्यामुळे प्रशासन खडबडून जागे झाले आहे. राज्यात ठिकठिकाणी कोंबड्या, पक्षी दगावत होते. परंतु, कोणत्या ही वैद्यकीय अहवाल समोर न आल्यामुळे बर्ड फ्लूमुळे मृत्यू झाला असे सिद्ध झाले नव्हते. पण, आता परभणीतील मुरुंबा गावातील एका पोल्ट्री फॉर्ममध्ये 800 कोंबड्यांचा मृत्यू हा बर्ड फ्लूमुळे झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
त्यानंतर आता प्रशासनाने खबदारी म्हणून पावलं उचलली आहे. बर्ड फ्लूचा फैलाव होऊ नये म्हणून मुरुंबा गावातील 10 हजार कोंबड्या आज संध्याकाळपर्यंत नष्ट करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्ह्याधिकाऱ्यांनी दिली. ज्या पोल्ट्री फॉर्ममध्ये कोंबड्यांचा मृत्यू झाला त्या 1 किलोमीटर परिसरातील दहा हजार कोंबड्या नष्ट करण्यात येणार आहे.
गाव आणि परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित
तसंच, मुरुंबा येथे पोल्ट्री फार्ममध्ये मृत कोंबड्या आढळून आल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने मुरुंबा गाव आणि परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. या ठिकाणी असलेल्या नागरिकांना, बाहेर पडण्यास मज्जाव करण्यात आला असून, नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी केले आहे.
लातूरमध्ये 400 कोंबड्यांचा मृत्यू
दरम्यान, लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यात 10 जानेवारी रोजी पोल्ट्री फार्ममधील 400 कोंबड्या अचानकपणे दगावल्यामुळे लातूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पशुवैद्यकीय पथकाने पाहणी करुण नमुने घेतले असून कोंबड्या दगावल्याने लातूर जिल्ह्यातील केंद्रेवाडी परिसरात अलर्ट झोन जाहीर करण्यात आला आहे.
मृत्यूचे कारण अस्पष्ट असल्याने अहवाल येईपर्यंत दहा किलो मिटरपर्यंतचा परिसर प्रतिबंधित करण्यात आला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.