वेदनादायी! महाराष्ट्राच्या खेडेगावातून मेहनतीच्या जीवावर IAS झाले, मात्र कोरोनाने होत्याचं नव्हतं केलं

वेदनादायी! महाराष्ट्राच्या खेडेगावातून मेहनतीच्या जीवावर IAS झाले, मात्र कोरोनाने होत्याचं नव्हतं केलं

कोरोना नावाच्या राक्षसाने अवघ्या 35 व्या वर्षी त्यांचा बळी घेतला आहे.

  • Share this:

परभणी, 10 ऑक्टोबर : परभणी जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या पालम तालुक्यातील, उमरा या गावातून आयएएस अधिकारी झालेल्या सुधाकर शिंदे यांचा पुणे येथे कोरोनाने मृत्यू झाला. त्यांच्या या दुर्दैवी निधनामुळे त्यांच्या गावावर आणि जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. सुधाकर यांनी शिकून मोठं व्हावं यासाठी त्यांचे सगळ्यात मोठे बंधू सुरेश शिंदे यांनी औरंगाबाद येथे खासगी कंपनीत नोकरी करत आपल्या जिवाचं रान केलं होतं. त्यांच्या कष्टाला आणि सुधाकर यांच्या मेहनतीला यश मिळत 2015 साली सुधाकर हे त्रिपुरा कॅडर मधून, आयएएस अधिकारी झाले. मात्र कोरोना नावाच्या राक्षसाने अवघ्या 35 व्या वर्षी त्यांचा बळी घेतला आहे.

परभणी जिल्ह्याची ओळख मागास जिल्हा म्हणूनच आहे. त्यात पालम सारख्या अतिदुर्गम भागामध्ये तर वाहतुकीची आणि ग्रामीण भागातील रस्त्याची अत्यंत दुरवस्था आहे. याच भागात तालुक्याच्या शहरापासून दहा ते बारा किलोमीटर असलेल्या उमरा या गावामध्ये सुधाकर यांचा जन्म झाला होता. जन्मानंतर अवघ्या तीन वर्षातच त्यांच्या आईचं निधन झालं. त्यानंतर वडील आणि मोठ्या चार भाऊ आणि बहिणींनी त्यांचा सांभाळ केला. सुधाकर सगळ्यात लहान असल्याने त्यांनी शिक्षण घ्यावे आणि पुढे जावो, अशी घरातील सर्वांची इच्छा होती. त्यासाठी सुधाकर यांचे मोठे बंधू, सुरेश यांनी एका खासगी कंपनीमध्ये काम करत करत सुधाकर यांना शिकवण्याचा ध्यास घेतला.

उमरा या गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये चौथीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर सुधाकर यांनी कन्नड येथील नवोदयमधून पुढील शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये बी टेकचे शिक्षण पूर्ण केले. परंतु आपल्याला काहीतरी मोठं करायचा आहे हा ध्यास घेऊन, त्यांनी आयएएसच्या परीक्षा द्यायला सुरुवात केली. त्यासाठी दिल्ली आणि पुणे येथे भावाच्या मदतीने त्याने पुढील शिक्षणाची सुरुवात केली. यामध्ये यश मिळत वयाच्या 30 व्या वर्षी, म्हणजेच 2015 साली सुधाकर हे त्रिपुरा कॅडरमधून आयएएस झाले. सुधाकरच्या यशाने त्यावेळी गाव सह जिल्ह्यामध्ये मोठा जल्लोष झाला होता.

मात्र ज्या कोरोनाने अख्ख्या जगात हाहाकार माजवला त्याने शिंदे कुटुंबियांनाही हादरा दिला. आयएएस झाल्यानंतर अवघ्या पाच वर्षांतच सुधाकर यांना काळाने कुटुंबापासून हिरावून घेतले. त्रिपुरामध्ये कार्यरत असतानाच सुधाकर हे अधूनमधून गावाकडे येत होते. मागील आठ ते दहा दिवसांपूर्वी ते गावाकडे आले असता, गावाजवळ असलेल्या एका विहिरीमध्ये पोहोण्यासाठी गेले. त्यावेळी पाणी कानात गेल्याने त्यांनी नांदेड येथे उपचार घेतले. त्यावेळी त्यांची कोरोनाची चाचणी निगेटिव्ह आली.

नांदेड येथे उपचार केल्यानंतर मोठा भाऊ औरंगाबाद येथे असल्याने त्याला भेटण्यासाठी औरंगाबादमध्ये गेल्यावर त्यांना पुन्हा त्रास सुरू झाला. सर्दी आणि ताप असा त्रास होत असल्याने त्यावेळी त्यांची कोरोनाची चाचणी करण्यात आली. पण प्रकृतीमध्ये बिघाड होऊ लागला, त्यांच्यावर उपचार करण्यासाठी त्यांना पुणे येथील रुबी क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले. परंतु प्रकृतीने साथ न दिल्याने काल अखेर त्यांनी जगाचा निरोप घेतला.

संपूर्ण कुटुंबासमोर अडचणींचा डोंगर

सुधाकर यांच्या अचानक जाण्याने गावासह संपूर्ण जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. तर त्यांच्या कुटुंबावर मोठे संकट उभे राहिले. घरातील एक मोठे भाऊ आणि वडील गावात आहेत, तर इतर लोक पुणे येथे गेलेले आहेत. परंतु वडील आणि भावाला प्रकृती अस्वस्थ्यामुळे डॉक्टरांच्या निगराणीखाली राहावे लागत आहे. त्यात वडिलांचे वय जास्त झाले असल्याने त्यांना होत असलेला त्रास पाहून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत. एकूणच कोरोनाने सुधाकर शिंदे यांचा मृत्यू झाल्यानंतर शिंदे कुटुंबासमोर जणू अडचणींचा डोंगरच उभा राहिला आहे.

Published by: Akshay Shitole
First published: October 10, 2020, 10:52 PM IST

ताज्या बातम्या