भाजपच्या कोअर कमिटीतून पंकजा बाहेर; गोपिनाथ गडावरून कार्यकर्त्यांना केलं आवाहन

भाजपच्या कोअर कमिटीतून पंकजा बाहेर; गोपिनाथ गडावरून कार्यकर्त्यांना केलं आवाहन

मी पराभवामुळे खचून जाणारी व्यक्ती नाही. मी संघर्ष करत राहणार, असं सांगताना पंकजा मुंडे यांनी 26 जानेवारीली गोपिनाथ प्रतिष्ठानची मुहूर्तमेढ रोवण्याची घोषणा केली. पक्ष सोडणार नाही, असं सांगताना त्यांनी कोअर कमिटीचा मात्र राजीनामा दिला आहे.

  • Share this:

परळी, 12 डिसेंबर : मी पराभवामुळे खचून जाणारी व्यक्ती नाही. मी संघर्ष करत राहणार, असं सांगताना पंकजा मुंडे यांनी 26 जानेवारीली गोपिनाथ प्रतिष्ठानची मुहूर्तमेढ रोवण्याची घोषणा केली. दिवंगत नेते गोपिनाथ मुंडे यांच्या जन्मदिवसानिमित्त परळीजवळच्या गोपिनाथ गडावरून भाषण करताना त्यांनी आणखी एक मोठी घोषणा केली. "आता मी मुक्त आहे. मी आता आमदारही नाही. पक्षाच्या कोअर कमिटीमधून मला मुक्त करा. मी मशाल घेऊन राज्यभर दौरा करणार. तुम्ही आहात ना माझ्याबरोबर", असं आवाहन पंकजा यांनी कार्यकर्त्यांना केलं.

पद मिळवण्यासाठी मी दबावतंत्र वापरते, असे माझ्यावर आरोप झाले. मी आता कोअर कमिटीचासुद्धा राजीनामा देते आहे, असं पंकजा मुंडे गोपिनाथ गडावरच्या कार्यक्रमानंतर बोलताना म्हणाल्या. "मी संघर्ष करणार, काम करणार. माझ्या लोकांनी घाबरू नये. 26 जानेवारीला मुंबईत कार्यालय सुरू करणार आहे. तिथून गोपिनाथ प्रतिष्ठानचं काम करणार. 27 जानेवारीला लाक्षणिक उपोषण करणार", असं त्या म्हणाल्या. 2014 भाजपचा मुख्यमंत्री करण्यास योगदान दिलं आता कोअर कमिटीच्या जबाबदारीतून मुक्त करा, अशी मागणी पंकजा यांनी केली. मला मुख्यमंत्री व्हायचंय असं म्हटलं तर त्यात काय चुकीचं, असंही त्या म्हणाल्या.  एका महिलेनं राज्याचं नेतृत्व करण्याची अपेक्षा ठेवली तर त्यात चूक काय, असा सवाल त्यांनी केला.

"मी आधी परळीची होते आता राज्याची आहे. पंकजा मुंडे बेईमान होणार नाही. मला कुठल्याही पदाची अपेक्षा नाही. आता भाजपच्या कोर्टात बॉल आहे. पक्षानं जे करायचं ते करावं", असं पंकजा म्हणाल्या.

संंबंधित - 'पक्ष माझ्या बापाचा, मी कुठेही जाणार नाही', पंकजा मुंडे गरजल्या!

गोपिनाथ प्रतिष्ठानच्या माध्यमातून काम करत राहणार, असं त्या म्हणाल्या. मराठवाड्याच्या सिंचनाच्या प्रश्नावर लक्ष वेधून घेण्यासाठी 27 जानेवारीला लाक्षणिक उपोषण करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यभरातल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार. त्यासाठी मशाल घेऊन राज्यभर फिरणार, असंही मुंडे यांनी सांगितलं.

संबंधित - मी पक्षात राहून संघर्ष करणार; पंकजांनी दिला 26 जानेवारीचा 'लक्ष्यवेधी' इशारा

दिवंगत भाजप नेते गोपिनाथ मुंडे यांच्या जन्मदिवसानिमित्त परळीतल्या गोपिनाथ गडावर पंकजा मुंडे यांनी आपल्या समर्थकांसह जोरदार शक्तिप्रदर्शन केलं. यामध्ये पंकजा यांच्याबरोबर लक्षवेधी ठरलं एकनाथ खडसे यांचं बोलणं. खडसे काय बोलणार, पक्ष सोडणार का याकडे लक्ष होतं. कुठलीही औपचारिक घोषणा या नेत्यानं केलेली नसली, तरी त्यांनी राज्यातल्या पक्षनेतृत्वावर तोफ डागली तीसुद्धा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत.

संबंधित - भाजपतला अंतर्गत वाद चव्हाट्यावर; भर सभेत नाव न घेता फडणवीसांवर घणाघाती आरोप

विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नाव न घेता खडसे यांनी भर सभेत नाराजी व्यक्त केली. लोक पक्ष सोडून जावेत, अशी वागणूक दिली जात आहे, असं ते म्हणाले. आम्ही त्यांना मोठं केलं. त्यांच्याकडून अशी अपेक्षा नव्हती, असंही खडसे म्हणाले.

Published by: Arundhati Ranade Joshi
First published: December 12, 2019, 4:10 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading