मराठवाड्यातील भाजपच्याच बैठकीला पंकजा मुंडे गैरहजर

मराठवाड्यातील भाजपच्याच बैठकीला पंकजा मुंडे गैरहजर

पंकजा मुंडे या मराठवाड्यातील बैठकीला आल्या नाहीत, त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

  • Share this:

औरंगाबाद, 09 डिसेंबर : औरंगाबादमध्ये  भाजपची विभागीय आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे.  या बैठकीला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उपस्थित आहेत. परंतु, या बैठकीला भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे गैरहजर आहे.

औरंगाबादमध्ये होत असलेल्या भाजपच्या या बैठकीत मराठवाड्याच्या जिल्हा वार आढावा घेण्यात येणार आहे. मराठवाड्यात मागील निवडणुकीमध्ये झालेल्या जय, पराजय विषयी तक्रारीबद्दल चिंतन केले जाणार आहे. या बैठकीला मराठवाड्यातील महत्वाचे नेते उपस्थित राहणे अपेक्षित होते. परंतु, बैठकीच्या सुरुवातीला पंकजा मुंडे उपस्थित नाहीत. त्यामुळे राजकीय चर्चा सुरू झाली.

मात्र, पंकजा मुंडे सर्व जिल्ह्याच्या बैठकीला उपस्थित राहणे आवश्यक नाही. संध्याकाळी बीड जिल्ह्याच्या बैठकीला त्या उपस्थित राहतील, अशी माहिती भाजपकडून देण्यात आली होती.

मात्र, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्वता:च जाहीर केले की, 'पंकजा यांची तब्येत बरी नाही आणि 12 तारखेला गोपीनाथ मुंडे यांची जयंती आहे. त्या कामात व्यस्त असून त्यांनी हजार न राहण्याची परवानगी घेतली आहे.'

असं असलं तरी पंकजा मुंडे या मराठवाड्यातील बैठकीला आल्या नाहीत, या विषयी राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

पंकजा मुंडेंचा 'त्या' फेसबुक पोस्टबद्दल खुलासा

दरम्यान, काही दिवसांपूर्वी पंकजा मुंडे यांनी, 'मला तुमच्याशी बोलायचंय, 12 डिसेंबरला आपल्या गोपीनाथगडावर भेटू' अशी पोस्ट फेसबुकवर टाकली होती. त्यांच्या या पोस्टमुळे पंकजा या भाजपातून बाहेर पडणार, अशी राजकीय चर्चा रंगली होती. परंतु, पंकजा यांनी 'मी दरवर्षी 12 डिसेंबरला गोपीनाथ गडावर जात असते. पण, त्यानंतर सर्वच वृत्तवाहिन्यांनी मी भाजप सोडणार अशी चर्चा सुरू झाली. या वृत्तांमुळे मी प्रचंड व्यथित आणि दुखी झाली आहे, अशी प्रतिक्रिया पंकजांची दिली होती. तसंच, 'मी कोणत्याही पदासाठी लाचारी स्वीकारली नाही. कोणतंही पद मिळावं म्हणून दबावतंत्र केलं नाही, हे माझ्या रक्तात नाही. मला आत्मचिंतन आणि माझ्या लोकांशी बोलण्यासाठी मला वेळ द्या', अशी विनंतीही पंकजांनी केली.

'पंकजा मुंडेंच्या पराभवाला भाजप नेत्यांचा संबंध नाही'

पंकजा मुंडे यांच्या पराभवात भाजप नेते किंवा पदाधिकारी यांचा संबंध नसल्याचे वक्तव्य शिवसंग्रामचे आमदार विनायक मेटे यांनी केले आहे. रोहिणी खडसे आणि पंकजा मुंडे यांच्या पराभवासाठी भाजपमध्ये अंतर्गत राजकारण झाले, अशी चर्चा होती. या बाबतीत एकनाथ खडसे यांनी पुष्टी दिली होती.

आमदार विनायक मेटे यांना विचारले असता ते म्हणाले, या चर्चेत तथ्य नाही. 'पराभवाची कारण जे पराभूत झाले ते शोधतील. मात्र, बीड जिल्ह्यापुरते उदाहरण घेतले तर असा कोणता बाहेरचा नेता आहे की, ज्याचे इथे पन्नास-शंभर कार्यकर्ते आहेत. त्यांनी विरोधात काम केले, असं तर निदर्शनास आले नाही.' बीडमध्ये व्यसनमुक्ती कार्यक्रमासंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत आमदार मेटे बोलत होते.

एकनाथ खडसे शरद पवारांच्या भेटीला

दरम्यान, दुसरीकडे भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे पक्षात कमालीचे नाराज आहे. आज त्यांनी नवी दिल्लीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली.  जल आयोगाच्या काही प्रस्तावाबाबत मी शरद पवार यांची भेट घेतली, या भेटीत  मुलीच्या पराभवाबाबत निवडणुकीत काय झाले याची विचारपूस शरद  पवार यांनी केली, असा खुलासा खडसेंनी केला. तसंच उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असून विधानसभा निवडणुकीत दोषी लोकांच्या कारवाईची मागणी करणार असल्याचंही खडसेंनी सांगितलं.

 

 

Published by: sachin Salve
First published: December 9, 2019, 7:16 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading