सुरेश जाधव, प्रतिनिधी
बीड, 19 मार्च : शिंदे सरकार निवडणुकीपासून लांब पळत असल्याचा आरोप करत विरोधी पक्षाकडून वारंवार निवडणुका घेण्याचं आव्हान केलं जात आहे, त्यातच आता भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनीही निवडणुका घेण्याचं आक्रमक विधान केलं आहे. 'आता निवडणुका घ्याच, कार्यकर्त्यांनो कामाला लागा..तुमच्या आणि माझ्या संघर्षाला सोन्याचे दिवस येतील. आपण आपला हक्क हात आपटून घेऊ', असं म्हणत पंकजा मुंडे यांनी निवडणुकीसाठी वज्रमुठ आवळली आहे.
'मुंडे साहेबा सारखा करणं, त्यांची कॉपी करणे, याच्याने मुंडे साहेब होत नाही. तर त्यांच्या विचाराचे अनुकरण करून वागणं म्हणजे मुंडे साहेब आहे', असं म्हणत नाव न घेता धनंजय मुंडेंवर देखील पंकजा मुंडे यांनी निशाणा साधला. राजकारण धर्माने करा, मात्र धर्माचे राजकारण करू नका, फंड निधी यापेक्षा पुढे जाऊन राजकारण आहे. असंही त्या यावेळी म्हणाल्या.
मठातला एखादा माणूस जवळ घेऊन लोकं जवळ आले, असा अविर्भाव आणू शकत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला. बीडच्या अंबाजोगाई येथे भाजप कार्यकर्ता बैठकीत पंकजा मुंडे बोलत होत्या.
'आता लागा कामाला माझ्या आणि तुमच्या संघर्षाला सोन्याचे दिवस येतील. आता आपण हात आपटून आपला हक्क घेऊ. येणाऱ्या निवडणुकीला ताकतीन सामोरे जा. मी तुमच्या पाठीशी आहे. तुम्ही मला कर्ज दिले ते कर्ज तुम्ही गोपीनाथ मुंडेंवर प्रेम करून दिले. पालकमंत्री कुणी असो मात्र मी तुमची पालक आहे', अशी साद पंकजा मुंडे यांनी आलेल्या कार्यकर्त्यांना घातली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP, Pankaja munde