पंढरपूरला छावणीचं स्वरुप, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शहरात 400 पोलिसांचा बंदोबस्त

पंढरपूरला छावणीचं स्वरुप, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शहरात 400 पोलिसांचा बंदोबस्त

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी खबदारीचा उपाय म्हणून शहरात तगडा पोलीस बंदोबस्त लावला आहे.

  • Share this:

पंढरपूर, 30 ऑगस्ट : विठ्ठल रुक्मिणी मंदिर दर्शनासाठी खुले करावे या मागणीसाठी उद्या वंचित बहुजन आघाडी आणि विश्व वारकरी सेनेच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे. आंदोलनाससाठी वंचित आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर हे पंढरपूर जवळच्या माळीनगरमध्ये दाखल झाले आहेत. याच आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी खबदारीचा उपाय म्हणून शहरात तगडा पोलीस बंदोबस्त लावला आहे.

शहरात 50 पोलीस अधिकारी आणि एकूण 400 पोलीस बंदोबस्तासाठी दाखल झाले आहेत. आंदोलक शहरात येऊ नये यासाठी शहराला जोडणाऱ्या प्रमुख सात रस्त्यावरून तिहेरी नाकाबंदी करण्यात आली आहे. तसंच मंदिर परिसरातील छोठेमोठे 30 रस्ते देखील बंद करण्यात आल्याची माहिती सोलापूरचे अप्पर जिल्हा पोलीस अधिक्षक अतुल झेंडे यांनी दिली. या सगळ्यामुळे पंढरपूरला छावणीचं स्वरुप आल्याचं दिसत आहे.

राज्यात दारू, गुटख्याची दुकानं चालू असताना विठ्ठल मंदिर बंद का? असा सवाल विश्व वारकरी सेनेचे संस्थापक ह.भ.प.अरुण महाराज बुरघाटे व ह.भ.प. शेट्ये महाराज यांनी सरकारला केला आहे. सरकार प्रतिसाद देत नसल्यानं 31 ऑगस्टला मोठ्या संख्येने पंढरपूरला येण्याचं आवाहन वारकरी बांधवांना करण्यात आलं आहे.

एकही एसटी बस धावणार नाही!

पंढरपूरात उद्या दिवसभर एसटी वाहतूक बंद असणार आहे. पंढरपूर आगारातून एकही एसटी बस बाहेरगावी जाणार नाही. वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य परिवहन महामंडळाने हा निर्णय घेतला आहे.

Published by: Akshay Shitole
First published: August 30, 2020, 8:25 PM IST

ताज्या बातम्या