पोलिसांच्या छाप्यामुळे पंढरपूरमधील खासगी सावकारांमध्ये खळबळ; स्टॅम्प, कोरे चेक, कागदपत्रे जप्त

पोलिसांच्या छाप्यामुळे पंढरपूरमधील खासगी सावकारांमध्ये खळबळ; स्टॅम्प, कोरे चेक, कागदपत्रे जप्त

पोलिसांच्या कारवाईमुळे पंढरपूर तालुक्यातील अवैध खासगी सावकारी करणार्‍यांमध्ये खळबळ उडाली आहे.

  • Share this:

वीरेंद्रसिंह उत्पात, पंढरपूर, 2 फेब्रुवारी : खासगी सावकाराकडून त्रास होत असल्यामुळे 2 शेतकर्‍यांनी सहाय्यक निबंधक कार्यालयाकडे तक्रार दाखल केली. याची दखल घेवून अधिकार्‍यांनी खासगी सावकाराच्या घरावर शुक्रवारी धाड टाकली. यामध्ये घराची तपासणी केली असता स्टॅम्प, कोरे चेक आणि कागदपत्रे मिळून आली. यावरून सावकाराने शेतकर्‍यांना त्रास दिल्याचे उघड झाले आहे. या कारवाईमुळे पंढरपूर तालुक्यातील अवैध खासगी सावकारी करणार्‍यांमध्ये खळबळ उडाली आहे.

टाकळी येथील महात्मा फुले नगरात राहणारे दिनकर शिंदे हे अवैध खासगी सावकारी करत होते. त्यांनी अनेक शेतकरी, व्यापार्‍यांना व्याजाने रक्कम दिलेली आहे. रक्कम देताना ते शेतकरी आणि व्यापार्‍यांकडून कोरे चेक, स्टॅम्प आणि कागदपत्रे घेत होते. रक्कम फेडल्यानंतर आणखी रक्कम आहे असे सांगून दमदाटी करून शेतकरी आणि व्यापार्‍यांनी दिलेले चेक न्यायालयात दाखल करून रक्कम वसूल करत होते. शिंदे यांनी अनेक शेतकरी व व्यापार्‍यांना त्रास देवून आर्थिक लुबाडणूक केली आहे.

अजित पवारांच्या PAच्या भावावर जीवघेणा हल्ला, शस्त्रांनी केले डोक्यात वार

तालुक्यातील सोनके येथील शेतकरी नेताजी खरात यांनी 60 हजार तर तिसंगी येथील बाळासाहेब सप्ताळ यांनी 1 लाख रुपये सावकार शिंदे यांच्याकडून घेतले होते. रक्कम घेताना स्टॅम्प, कोरे चेक, कागदपत्रे दिली होती. त्यांनी या रक्कमेची व्याजासह परतफेड केली होती. तरीही शिंदे यांनी तुमच्याकडे आणखी रक्कम आहे असे सांगून न्यायालयात कोरे चेक सादर केले. चेक सादर करताना त्यांनी न्यायालयात या दोघांनी माझ्याकडून उसणवारी रक्कम घेतल्याचे खोटे सांगितले होते.

पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये गुंडांचा हैदोस, 70 गाड्यांची तोडफोड

सावकार शिंदे याच्याकडून त्रास होऊ लागल्यामुळे शेतकरी नेताजी खरात आणि बाळासाहेब सप्ताळ यांनी सहाय्यक निबंधक कार्यालयात जावून सावकार शिंदे यांच्याविरुध्द सहाय्यक निबंधक एस.एम. तांदळे यांच्याकडे तक्रार दाखल केली. याची दखल घेवून तांदळे यांनी पथकासह अवैध सावकारी करणार्‍या शिंदे यांच्या घरावर छापा मारला. यावेळी त्यांना अनेक शेतकरी व व्यापार्‍यांकडून घेतलेले स्टॅम्प, कोरे चेक, कागदपत्रे आढळून आली. सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. अवैध सावकारी करणार्‍या सावकाराच्या घरावर छापा टाकल्यामुळे खासगी सावकारांचे धाबे दणाणले आहे.

First published: February 2, 2020, 5:30 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading