धोंडोपंत महाराज शिरवळकर यांचं निधन, वारकरी संप्रदायावर पसरली शोककळा

धोंडोपंत महाराज शिरवळकर यांचं निधन, वारकरी संप्रदायावर पसरली शोककळा

तुकोबारायांच्या गाथा भजनाची सेवा व परंपरागत वारकरी भजन यासाठी दादामहाराज हे संप्रदायातील लहानाथोरांना परिचीत होते.

  • Share this:

पंढरपूर, 6 जुलै : शिरवळकर फडाचे मालक ह.भ.प.धोंडोपंत (दादा) महाराज शिरवळकर यांचे अल्पशा आजाराने निधन झालं आहे. ते 57 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने वारकरी संप्रदायावर शोककळा पसरली आहे.

जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथा भजनाची सेवा व परंपरागत वारकरी भजन यासाठी दादामहाराज हे संप्रदायातील लहानाथोरांना परिचीत होते. गेल्या काही दिवसांपासून किडणीच्या आजाराने ग्रस्त झाले असतानाही हातात काठीचा आधार घेऊन त्यांनी अनेक ठिकाणी आपली भजनाची व किर्तनाची सेवा अत्यंत निष्ठेने पार पाडली होती.

शिरवळकर फडाची तुकोबांवर व गाथेवर प्रगाढ श्रद्धा. पूर्वी पंढरपूर येथील तुकाराम मंदिराचे बांधकाम होण्याआधी तुकोबांची पालखी पंढरपुरात शिरवळकर वाड्यात उतरत असे. देहू येथील बीजेच्या उत्सवामध्ये विठोबा रखुमाई मंदिरातील मुख्य मंडपातील सर्व कार्यक्रम शिरवळकर फडाचे असतात. या कार्यक्रमात दादा महाराजांची व त्यांचे वडील वै. तुकाराम बुवा यांची कीर्तन या मंडपात ऐकली आहेत. त्या किर्तनात टेंभूकर मंडळी टाळ घेऊन उभे राहत. त्यांच्या कीर्तनात सांप्रदायिक चालींची मेजवानीच असे. महाराजांच्या आकस्मिक निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे.  त्यांचे पश्चात आई ,पत्नी, दोन मुले,मुली, व हजारोंचा फडातील शिष्यसमुदाय आहे

ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील मुख्य मानकरी, पालखी सोहळा उपाध्यक्ष, पालखी सोहळ्यात रथापुढे 13 दिंडी शिरवळकर फडाची परंपरा आहे. तसंच आळंदीच्या ज्ञानेश्वर महाराज मंदिरात मुख्य पहारेकरी म्हणूनही शिरवळकर फडाची परंपरा आहे.ह.भ.प.धोडोंपत(दादा) महाराज शिरवळकर यांचे अंत्यसंस्कार परंपरेप्रमाणे विष्णुपद येथे करण्यात आले.

संपादन - अक्षय शितोळे

.

 

First published: July 6, 2020, 9:27 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading