पंढरपूरमध्ये सेवानिवृत्त महिला इन्सपेक्टरनेच महिला पोलिसाला केलं जखमी, तर PSI ला घेतला चावा

पंढरपूरमध्ये सेवानिवृत्त महिला इन्सपेक्टरनेच महिला पोलिसाला केलं जखमी, तर PSI ला घेतला चावा

एका सेवानिवृत्त महिला पोलीस अधिकाऱ्यानेच असं वर्तन केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

  • Share this:

पंढरपूर, 24 ऑक्टोबर : पोलीस खातं हे आपल्या शिस्तीसाठी ओळखलं जातं. मात्र याच खात्यात अनेक वर्ष काम करून सेवानिवृत्त झालेल्या महिला पोलीस इन्सपेक्टरने भर रस्त्यात उद्दामपणा दाखवल्याचा प्रकार पंढरपूरमध्ये घडला आहे. गाडी अडवल्याचा राग मनात धरून सेवानिवृत्त महिला पोलीस इन्सपेक्टरने वाहतूक नियमनाचे काम करणाऱ्या एका महिला पोलिसाला जखमी केले, तर दुसऱ्या महिला पोलीस उपनिरीक्षकाच्या गणवेशावर असलेली नेमप्लेट तोडून दाताने चावा घेतला.

फिर्यादी महिला पोलिस सोनाली इंगोले या उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयासमोरील रस्त्य़ावर वाहतूक नियमन करत होत्या. त्यावेळी कोर्टी रस्त्याच्या बाजूने एक कार आली.रेल्वेपूलाच्या दिशेने ही कार जात असताना फिर्यादी महिला कर्मचारी सोनाली इंगोले यांनी रस्त्याचे काम सुरु असल्याने तुम्हाला तेथून जाता येणार नाही असं समजावून सांगितलं.

परंतु तरीही सदर सेवानिवृत्त महिला पोलिस इन्सपेक्टर वंदना उत्तम शिरगिरे (रा.इसबावी) आणि कारमधील चालक यांनी सोनाली इंगोले यांच्याशी हुज्जत घातली.रस्त्यावर कार आडवी लावून वाहतूक कोंडी केली. समजावून सांगूनही आरोपींनी आरडाओरड करुन मोबाईलमध्ये चित्रीकरण केलं. तेव्हा फिर्यादी सोनाली इंगोले यांनी त्यास मज्जाव केला आणि दोन्ही आरोपींना पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात आणले.

साक्षीदार महिला पोलिस उपनिरीक्षक महाडीक यांच्या गणवेशावर असलेली नेम प्लेट तोडून त्यांच्या बोटाचा चावा आणि फिर्यादी सोनाली इंगोले यांना नखाने ओरखडले. या प्रकरणी पोलिस कर्मचारी सोनाली इंगोले यांनी दिलेल्या फिर्यादी वरुन पोलिसांनी आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक श्री.गाडेकर पुढील तपास करत आहेत.

दरम्यान, एका सेवानिवृत्त महिला पोलीस अधिकाऱ्यानेच असं वर्तन केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

Published by: Akshay Shitole
First published: October 24, 2020, 7:07 PM IST

ताज्या बातम्या