विठ्ठलाच्या पंढरीत रोडरोमियोंच्या जाचाला कंटाळून मुलीनं केली आत्महत्या

विठ्ठलाच्या पंढरीत रोडरोमियोंच्या जाचाला कंटाळून मुलीनं केली आत्महत्या

दहावीमध्ये शिक्षण घेत असलेल्या काजलच्या या आत्महत्येमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

  • Share this:

पंढरपूर, २४ जानेवारी २०१९- वाखरी इथल्या आश्रमशाळेत शिकणाऱ्या काजल पोरे या मुलीनं गळफास लावून आत्महत्या केली. रोडरोमियोंच्या जाचाला कंटाळून तिनं आत्महत्या केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. याप्रकरणी पंढरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अद्यापही कोणाला अटक नाही.

पंढरपूर तालुक्यातील वाखरी येथील आश्रमशाळेत शिक्षण घेत असलेल्या काजल दत्तात्रय पोरे या १६ वर्षांच्या विद्यार्थिनीने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची करुण घटना घडली. या घटनेमुळे पंढरपूर तालुक्यात खळबळ उडाली असून पंढरपूर तालुक्यातील ग्रामीण भागातही रोडरोमियोंनी उच्छाद मांडलेला असल्याचे अधोरेखीत झाले आहे. दहावीमध्ये शिक्षण घेत असलेल्या काजलच्या या आत्महत्येमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

याबाबत सदर विद्यार्थिनीचे वडील दत्तात्रय गजेंद्र पवार यांनी पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार मुलीच्या वडिलांना शाळेतील शिक्षक पी.जी. गायकवाड यांनी फोन करुन बोलावले होते व तुमच्या मुलीला एक लहान मुलगा मोबाइईल नंबरची चिठ्ठी देत होता, तेव्हा लक्ष ठेवा असे सांगितले होते. यासंदर्भात काजलच्या वडिलांनी २२ जानेवारीला तिला या प्रकरणी विचारले.

आपली परिस्थिती गरीबीची आहे त्यामुळे चांगले वाग शिक्षण घे अशी समज तिला दिली. शाळेमध्ये अनोळखी मुलाने चिठ्ठी देऊन विनाकारण मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती काजलने आपल्या वडिलांना दिली होती. मात्र दुसऱ्याच दिवशी काजलने घराच्या किचनचे दार आतून लावून घेतले. खूप वेळ झाला काजल दरवाजा उघडत नाही म्हणून घरच्यांनी दार वाजवले. मात्र आतून कोणताच प्रतिसाद मिळत नाही कळल्यावर काजलच्या वडिलांनी राहुल चव्हाण या त्यांच्य मेहुण्याच्या सहाय्याने दरवाजा उघडला. त्यावेळी त्यांना गळफास घेतलेला काजलचा मृतदेह दिसला.

काजलने घराच्या छताला असलेल्या लोखंडी पाईपला ओढणी बांधून गळफास घेतला. काजलला तातडीने उपचारासाठी पंढरीतील डॉ. पाचकवडे यांच्या दवाखान्यात नेण्यात आले. मात्र तिथून त्यांना उपजिल्हा रुग्णालयात घेऊन जाण्यास सांगितले. तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

यानंतर मुलीच्या वडिलांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. आपल्या मुलीला कोणीतरी अनोळखी मुलाने फोन नंबरची चिठ्ठी देण्याचा प्रयत्न करुन तिची बदनामी व्हावी म्हणून छेड काढून तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले असल्याची फिर्याद त्यांनी पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली. गुन्ह्याची नोंद पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास सुरू आहे.

Special Report : बाळासाहेब नावाचा झंझावात; काही गाजलेली भाषणं...

First published: January 24, 2019, 9:44 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading