Home /News /maharashtra /

अमित शहांसोबत नेमकी काय चर्चा झाली? उद्धव ठाकरेंनी राज्यासमोरच केला खुलासा

अमित शहांसोबत नेमकी काय चर्चा झाली? उद्धव ठाकरेंनी राज्यासमोरच केला खुलासा

उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत झालेल्या चर्चेचीही माहिती दिली.

    मुंबई, 20 एप्रिल : पालघरमध्ये झालेल्या साधूंच्या हत्याकांडानंतर राज्यातील राजकीय वातावरणही तापलं. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याला संबोधित करत असताना सरकारची भूमिका आक्रमकपणे मांडली. 'पालघर हत्याकांड प्रकरणातील कोणत्याही आरोपीला सोडणार नाही,' असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. तसंच यावेळी उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत झालेल्या चर्चेचीही माहिती दिली. पालघर प्रकरणावरून अमित शहा यांच्याशी झालेल्या संभाषणाबद्दल माहिती देताना उद्धव ठाकरे म्हणाले की, 'अमित शहा हे देशाचे गृहमंत्री आहेत. त्यांना सर्व माहिती मिळत असते. तेही म्हणाले की उद्धवजी या प्रकरणात धर्माचा संबंध नाही. पण काळजी घ्या.' दुसरीकडे, 'सोशल मीडियावरून आगी लावणाऱ्यांवर केंद्रीय गृह मंत्रालय आणि राज्य सरकार लक्ष ठेवून आहे. त्यांच्यावरही कारवाई करणार,' असंही उद्धव ठाकरे म्हणाले. दरम्यान, पालघर प्रकरणावरून राजकीय गदारोळही सुरू झाला होता. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यापासून भाजपच्या इतर नेत्यांनीही या प्रकरणावरून राज्य सरकारला कोंडीत पकडत चौकशीची मागणी केली होती. तसंच त्यानंतर पालघर घटनेबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी संवाद साधला. केंद्रीय गृहमंत्रालयाने या संपूर्ण प्रकरणाचा अहवाल महाराष्ट्र सरकारकडे मागितला आहे, अशी माहिती आहे. काय आहे पालघरमधील हत्या प्रकरण? पालघरमधील गडचिंचले गावात जमावाकडून दोन साधू आणि त्यांच्या चालकाची हत्या करण्यात आली. पालघरमधील दाभाडी-खानवेल मार्गावर नाशिककडून येणाऱ्या एका वाहनाला ग्रामस्थांनी रोखलं होतं. या प्रवाशांची विचारपूस पूर्ण ऐकून घेण्याच्या आतच ग्रामस्थांनी दगडफेक करायला सुरुवात केली. हेही वाचा- पालघर हत्याकाडांवर भाजपने रान उठवल्यानंतर गृहमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले.... या मारहाणीमध्ये चालकासह दोन प्रवाशांचा मृत्यू झाला. घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकारी तसंच पोलिसांचा मोठा फौजफाटा पोहोचला होता. संतप्त ग्रामस्थांनी पोलिसांच्या गाडीवरही दगडफेक केली. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.
    Published by:Akshay Shitole
    First published:

    Tags: Amit Shah, Palghar district, Uddhav thackeray

    पुढील बातम्या