पालघर, 6 फेब्रुवारी : मुंबई जवळच्या पालघरमध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मृत्यू झाल्याचं समजून कुटुंबाने व्यक्तीला पुरलं, पण आता पुरलेली ही व्यक्ती जिवंत असल्याचं समोर आलं आहे. आसपासची लोक आणि पोलिसांनाही याबाबतची माहिती मिळाली, त्यानंतर सगळेच धक्क्यात आहेत. 60 वर्षांची ही व्यक्ती रिक्षा चालक आहे.
पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार 29 जानेवारीला बोईसर रेल्वे स्टेशनवर ट्रेनखाली येऊन एका व्यक्तीचा मृत्यू झाला. पोलीस तपासामध्ये या व्यक्तीचं नाव रफीक शेख असल्याचं समोर आलं. मृत्यू झालेल्या व्यक्तीचा चेहराही रफीकशी मिळता जुळता होता, त्यामुळे रफीकच्या कुटुंबाचाही त्यांना ओळखण्यात गैरसमज झाला. यानंतर रफीकच्या पत्नीला केरळहून मुंबईला बोलावण्यात आलं. तीन दिवसानंतर रफीकवर अंत्यसंस्कार करून त्याला कब्रस्तानात पुरण्यात आलं.
रफीकचा व्हिडिओ कॉल
कब्रस्तानात पार्थिव दफन केल्यानंतर कुटुंब दु:खात होतं, तेव्हाच अचानक रफीक शेखचा त्याच्या मित्रांना व्हिडिओ कॉल आला. व्हिडिओ कॉलवर रफीकला पाहून त्याचे मित्रही धक्क्यात गेले. मित्रांनी घडलेला सगळा प्रकार रफीकच्या कुटुंबाला सांगितला. रफीक जिवंत असल्याचं कळल्यावर कुटुंब थोडावेळ हैराण झालं पण नंतर त्यांनाही आनंद झाला. ज्या व्यक्तीला दफन करण्यात आलं तो रफीक नसून दुसराच कोणीतरी होता. हा व्हिडिओ कॉल सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार रफीक काही महिन्यांपूर्वी कुटुंबाला सोडून गेला होता. कुटुंबानेही रफीकचा तपास केला पण त्यांना तो सापडला नाही, तेव्हा पोलिसांकडे तक्रार करण्यात आली. आता रफीक त्याच्या कुटुंबाकडे परत आला आहे, पण ज्या व्यक्तीवर रफीक शेख म्हणून अंत्यसंस्कार करण्यात आले, त्याला शोधण्याचं आव्हान पोलिसांसमोर आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.