उस्मानाबाद, 26 जुलै : यंदा जिल्ह्यात दमदार पाऊस होत आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील रामलिंग येथील धबधबा (Ramaling waterfall) ओसंडून वाहू लागला आहे. चारही बाजूला हिरवळ, डोंगर आणि त्यात वाहणारा धबधबा पर्यटकांना खुणावत आहे. उंचावरून फेसाळत कोसळणाऱ्या धबधब्याची चाहुल पर्यटकांना लागली आहे. पर्यटकही वर्षा सहलीसाठी (Rainy trips) रामलिंग धबधब्यावर गर्दी करत आहेत.
उस्मानाबाद जिल्ह्यातील येडशी शहरापासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर बालाघाट पर्वतरांगांच्या कुशीत श्रीक्षेत्र रामलिंग देवस्थान आहे. गर्द वनराईतील हा धबधबा पर्यटकांना आकर्षित करतो. पर्यटकांना एक अविस्मरणीय क्षण अनुभवायला देणारा परिसर म्हणून हे नावारूपास येत आहे. येथील धबधबा हे भाविकांचे व पर्यटकांचे मुख्य आकर्षण ठरत असते. श्रावणात सर्वत्र हिरवळ असते आणि या ठिकाणची माकडांची वर्दळ विशेष लक्ष वेधून घेते. रामलिंग देवस्थान हे महादेवाचे मंदिर द्रोणाच्या आकाराचे असून हेमाडपंती वास्तुशिल्पाचा व दगडीकामाचा अप्रतिम आविष्कार आहे.
येडशी या गावी बालाघाटात निसर्गरम्य पर्यावरणात रामलिंग मंदिर वसलेले आहे. जसा पावसाळा सुरू होतो तसे अनेक पर्यटक या ठिकाणी भेट देतात. पावसाळ्यात पूर्ण परिसर गर्द हिरवाईने नटलेला असतो. रामलिंग या मंदिराच्या भोवती एक वळसा घालून जाणाऱ्या नदीमुळे हे पर्यटन स्थळ आणखीनच मनमोहक बनते. उस्मानाबाद जिल्ह्यातील प्रमुख पर्यटकांपैकी रामलिंग हे देखील पर्यटन स्थळ आहे. येडशी रामलिंग अभयारण्याचे मुख्यालय येडशी येथे असून हे अभयारण्य उस्मानाबाद शहरापासून २० किमी. व बीड शहरापासून 95 किमी. अंतरावर आहे. लातूर-बार्शी हा रस्ता याच अभयारण्यातून जातो.
गुगल मॅपवरून साभार
हेही वाचा- Beed : बसस्थानकाला खड्ड्यांचा विळखा; बस चालकांसह प्रवाशांची तारेवरची कसरत, पाहा VIDEO
रामलिंग नाव कसे पडले
प्रभू रामचंद्र सीतेच्या शोधासाठी फिरत असताना जटायू पक्ष्याचे व रावणाचे युद्ध या रामलिंग ठिकाणी झाल्याची आख्यायिका येथील पुजार्यांकडून सांगितली जाते. जटायू पक्षी व रावणाच्या युद्धात जटायू पक्षी जखमी झाले. प्रभू रामचंद्र सीतेच्या शोधासाठी या ठिकाणी आल्यानंतर जटायू पक्षी त्यांना जखमी अवस्थेत आढळून आले. जटायूला पाणी पाजण्यासाठी व शिवशंकराची आराधना करण्यासाठी प्रभू रामचंद्रांनी आपल्या जवळील बाणाने पाणी काढले. ते पाणी जटायू पक्ष्याला पाजले. प्रभू रामचंद्रांनी तेथे लिंगाची स्थापना करून शिवआराधना केली. हे ठिकाण रामलिंग म्हणून ओळखले जाऊ लागले.
हेही वाचा- Akola : नाल्याच्या पाण्यासह घरात सापही शिरले, नागरिकांच्या त्रासात भर! पाहा VIDEO
धबधबा वाहू लागला
गेल्या आठवड्यात पावसामुळे या भागातील डोंगर दऱ्यातून मोठ्या प्रमाणात पाणी वाहू लागले आहे. दमदार पावसामुळे रामलिंग अभयारण्यातील छोटे नदी नाले पुन्हा एकदा वाहू लागले आहेत. रामलिंग तीर्थक्षेत्राची विशेष ओळख असलेला रामलिंगचा धबधबा या पावसामुळे 18 जुलैपासून वाहू लागला. त्यामुळे आता पर्यटक मोठ्या संख्येने येडशीच्या दिशेने धावू लागले आहेत. या ठिकाणी कुठल्याही प्रकारची दुर्घटना होऊ नये यासाठी प्रशासनातर्फे विशेष खबरदारी देखील घेतली जात आहे.
येडशी रामलिंग अभयारण्याचे मुख्यालय येडशी येथे असून हे अभयारण्य उस्मानाबाद शहरापासून 20 किमी. व बीड शहरापासून 95 किमी. अंतरावर आहे. लातूर-बार्शी हा रस्ता याच अभयारण्यातून जातो. हे अभयारण्य कळंब, भनसगाव आणि वडगाव या परिसरात विखुरले आहे.
रामलिंग म्हणजे जिवंतपणीचा स्वर्ग
रामलिंग हे उस्मानाबाद जिल्ह्यातील मुख्य पर्यटनस्थळ आहे. पावसाळ्याच्या दिवसामध्ये या ठिकाणी हिरवळ असते. त्यामुळे मन:शांती होती. इथल्या महादेवाचे दर्शन घेऊन धबधब्याकडे, डोंगर जढाई केल्यानंतर साक्षात जिवंतपणीचा स्वर्ग अनुभवाला मिळतो असे पर्यटक राजसिंह घाडगे यांनी सांगितले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Maharashtra News, Osmanabad