परमेश्वर सोनवणे, प्रतिनिधी
उस्मानाबाद, 7 जानेवारी : उस्मानाबाद जिल्हा हा कमी पर्जन्यमानामुळे कायमस्वरूपी दुष्काळी आणि मागासलेला जिल्हा म्हणून ओळखला जातो. शहरात सुसज्ज असे खाजगी रुग्णालय नसल्याने रुग्णांसाठी एकमेव पर्याय हा जिल्हा शासकीय रुग्णालय आहे. अॅडमीट होणारे सर्व रुग्ण हे गोरगरीब सामान्य नागरिक असतात. रुग्ण रुग्णालयात अॅडमीट झाल्यानंतर त्यांचे आणि नातेवाईकांचे जेवणासाठी हाल होतात. हीच बाब लक्षात घेता उस्मानाबाद शहरातील अन्नपूर्णा ग्रुप तर्फे मोफत जेवण दिले जाते.
कधी झाली स्थापना?
शहरातमध्ये मारवाडी गल्ली येथे 7 वर्षांपूर्वी अन्नपूर्णा ग्रुपकडून अन्नछत्राची स्थापना करण्यात आली. या अन्नछत्रामुळे रुग्णांचे आणि रुग्णांच्या नातेवाईकांचे होणारे जेवणाचे हाल संपुष्टात आले. अन्नछत्रांमध्ये दररोज दुपारी 1 वाजता आणि सायंकाळी 5 वाजता मोफत अन्नदान केले जाते. या जेवणाचा आस्वाद सरासरी दररोज 600 लोक घेत असतात.
11 लाख गरजू लोकांनी घेतला लाभ
अन्नपूर्णा ग्रुप मार्फत दरवर्षी वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. माझी चिऊ आता नको भिऊ, बेटी बचाओ बेटी पढाओ, मोतीबिंदू ऑपरेशन, व्यसनमुक्ती असे विविध उपक्रम राबविण्यात आले आहेत. अन्नछत्राची स्थापना झाल्यापासून गेल्या 7 वर्षात 11 लाख गरजू लोकांनी मोफत अन्नछत्राचा लाभ घेतला आहे. तसेच या ग्रुप मार्फत मागील 4 वर्षांपासून शहरात मापक दरात स्वर्गरथ सेवा चालू आहे, असं अन्नपूर्णा ग्रुपचे संस्थापक सदस्य अतुल अजमेरा यांनी सांगितले.
अन्नछत्र कुठे आहे?
उस्मानाबाद शहरातील जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या समोर हे अन्नछत्र आहे.
संपर्क:- अतुल अजमेरा 9881152551
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.