उस्मानाबाद, 17 ऑक्टोबर : पावसाने नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करण्यासाठी आज जिल्ह्याचे पालकमंत्री व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख दौऱ्यावर आले होते. गडाख यांनी यावेळी जिल्हाधिकारी व इतर अधिकारी यांची बैठक चक्क शेतकऱ्यांच्या बांधावर बोलावली. शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी जिल्हा प्रशासन नेमकं काय काम करते आहे, या उपाययोजनांचा आढावा बैठकीत घेण्यात आला.
'अतिृष्टीमुळे शेतकरी पूर्णपणे खचला आहे. पिचलेल्या शेतकऱ्याला आता आधार देणं गरजेचं असून आज शेताची पाहणी केली आणि अधिकाऱ्यांसोबत आढावा घेतला. उस्मानाबाद जिल्हात 736 गवापैकी 70 गावामध्ये मोठ्या प्रमाणत नुकसान झाले असून उरलेल्या गावांना देखील पावसाचा फटका बसला आहे. सात दिवसात पंचनामे पूर्ण करून सरकारला अहवाल सादर करा,' असे आदेश पालकमंत्री शंकरराव गडाख यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. ज्या ठिकाणी बैठक झाली त्याच ठिकाणी सगळ्यांना सोबत घेत जेवण देखील केले.
दरम्यान, निसर्गाच्या प्रकोपामुळे उध्वस्त झालेल्या शेतकऱ्याला आता शाब्दिक अधारासोबत आर्थिक आधार देणं गरजेचं आहे. शेतकऱ्याच्या बांधावर बैठक घेतली हे ठीक आहे, मात्र आर्थिक मदतही लवकर द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून करण्यात येत आहे.
या बैठकीत खासदार ओमराजे निंबाळकर, उस्मानाबादचे आमदार कैलास पाटील व उमरगाचे आमदार ज्ञानराज चौगुले व उस्मानाबादचे नगराध्यक्ष नांदुराजे निंबाळकर हेही उपस्थित होते.