कोरोनाबाधित रुग्णांना लुबाडणाऱ्या रुग्णालयाला दणका, पैसे परत द्यावे लागणार

कोरोनाबाधित रुग्णांना लुबाडणाऱ्या रुग्णालयाला दणका, पैसे परत द्यावे लागणार

सदर शुल्क सव्याज संबंधित रुग्णांना परत करण्याचे आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी दिले आहेत.

  • Share this:

वाशिम, 13 जानेवारी : वाशिम जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी सेक्युरा हॉस्पिटल येथे डेडीकेटेड कोविड हॉस्पिटल सुरु करण्यास परवानगी देण्यात आली होती. याठिकाणी उपचार घेतलेल्या 149 कोरोना बाधितांकडून उपचारासाठी अतिरिक्त शुल्क घेण्यात आल्याचे देयक तपासणीसाठी नियुक्त भरारी पथकाच्या अहवालामध्ये स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सदर शुल्क सव्याज संबंधित रुग्णांना परत करण्याचे आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी दिले आहेत.

राज्याच्या आरोग्य विभागाने खासगी रुग्णालयांनी कोविड बाधितांवर उपचारासाठी आकारावयाचे कमाल दर निश्चित करून दिले आहेत. मात्र, सेक्युरा हॉस्पिटल येथे कोविड बाधित रुग्णांवर उपचाराचे देयक वाजवी शुल्कापेक्षा जास्त दराने आकारल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार देयक तपासणीसाठी नियुक्त भरारी पथकाने सेक्युरा हॉस्पिटल येथे भरती असलेल्या व उपचार घेवून सुट्टी घेतलेल्या सर्व कोविड बाधित रुग्णांच्या देयकांची तपासणी केली.

या पथकाने जिल्हाधिकारी कार्यालयाल सादर केलेल्या अहवालावरून सेक्युरा हॉस्पिटलमध्ये उपचार घेतलेल्या 149 रुग्णांवर शासनाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा अतिरिक्त दराने देयक आकारणी झाल्याचे दिसून आले आहे.

सेक्युरा हॉस्पिटलचे व्यवस्थापक यांनी शासनाच्या अधिसूचनेतील निर्देशांचा भंग करून 149 कोविड बाधित रुग्णांकडून आकारलेली देयकातील नमूद तफावतीची 10 लक्ष 48 हजार 74 रुपये रक्कम सदर रुग्णांना सुट्टी मिळाल्यापासून ते आजपावेतो ‘पीएलआर’ दराने म्हणजेच 10 मार्च 2020 पासून 10 जून 2020 पर्यंत 12.90 टक्के दराने व 10 जून 2020 पासून 12.15 टक्के दराने सदर रक्कम रुग्णांच्या बँक खात्यात पुढील 15 दिवसांत म्हणजेच 27 जानेवारी 2021 पर्यंत जमा करावी. सदर कार्यवाहीचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर करावा, असा आदेश जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी निर्गमित केला आहे.

सदर आदेशाची अंमलबजावणी करण्यात टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधितांविरुद्ध मुख्य सचिव, महसूल व वन विभाग, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, महाराष्ट्र शासन यांचेकडील आदेश क्रमांक डीएमयु/2020/डीआयएसएम-1 दिनांक 29 जुलै 2020 मधील परिशिष्ट 3 मध्ये नमूद केल्याप्रमाणे आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 51 ते 60 व भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) कलम 188 नुसार तसेच साथरोग अधिनियम 1897 अन्वये दंडनीय तथा कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Published by: Akshay Shitole
First published: January 13, 2021, 9:38 PM IST

ताज्या बातम्या