मुंबई, 18 नोव्हेंबर : रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोकण रेल्वेच्या प्रमुख सर्व स्थानकांचे लवकरात लवकर सुशोभिकरण करण्याची प्रक्रिया येत्या सात दिवसांत सुरू करण्याचे तसेच सर्व स्थानकांच्या बाहेरील प्रमुख रस्त्यांचे क्रॉक्रींटकरण तातडीने सुरु करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिले आहेत. त्याचप्रमाणे कोकण रेल्वे मार्गावरील रत्नागिरी व कणवकवली येथे सुसज्ज रेल्वे पोलीस ठाणे उभारण्याच्या प्रक्रियेला वेग देण्याच्याही सूचना यावेळी देण्यात आल्या आहेत. यामुळे कोकणवासियांना दिलासा मिळणार असून, कोकण रेल्वे स्थानक आणि परिसराचा कायापालट होणार आहे.
मंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये बैठक
कोकण रेल्वे स्थानक ते मुख्य रस्त्यांना जोडणाऱ्या रस्त्यांचे मजबूतीकरण, नुतनीकरण, तसेच स्थानकांचे सुशोभिकरण अशा विविध विषयासंदर्भात सार्वजनिक बांधकाम मंत्री चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत आज बैठक पार पडली. या बैठकीला कोकण रेल्वचे वरिष्ठ अधिकारी, रेल्वे पोलीस अधिकारी तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी अधिकाऱ्यांना कामांबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.
हेही वाचा : आज बोलणार, उद्या सोनिया गांधींचे चरणस्पर्श करणार; उद्धव ठाकरेंच्या 'त्या' वक्तव्यावर सोमय्यांचा टोला
अधिकाऱ्यांना सूचना
मुंबईसह देशातील प्रमुख विमानतळांचे उत्कृष्टरित्या सुशोभिकरण व अत्याधुनिकीकरण करण्यात आल्यामुळे प्रवाशांना उत्तम सोयी-सुविधा उपलब्ध होतात. याच धर्तीवर कोकण रेल्वेमार्गावरील सर्व स्थानकांचे सुशोभिकरण व आधुनिकीकरण करण्याच्या सुचना यावेळी मंत्री चव्हाण यांनी दिल्या आहेत. तसेच, कोकण रेल्वे प्रशासनाने सुशोभिकरणासंदर्भात पुढाकार घ्यावा असेही त्यांनी यावेळी म्हटले.
हेही वाचा : Nagpur : सर्वसामान्यांना नडणाऱ्या दलालांना चाप, फक्त 7 दिवसांमध्ये होणार महत्त्वाची कामं
हजारो प्रवाशांना दिलासा
मुंबई- कोकणातून दरदिवशी हजारो प्रवासी कोकण रेल्वेने प्रवास करतात. परंतू, या हजारो प्रवाशांना रेल्वे स्थानकांवर तसेच या परिसरात कोणत्याही सोयी-सुविधा उपलब्ध नाहीत, त्यामुळे प्रवाशांना नेहमीच विविध समस्यांना सामोरे जावे लागते. काही प्रमुख रेल्वे स्थानकांचा अपवाद वगळता कोकण रेल्वे मार्गावरील रेल्वे स्थानकांची अवस्था अतिशय वाईट आहे. त्यामुळे ही सर्व रेल्वे स्थानके लवकर सुसज्ज करावीत तसेच, या प्रक्रियेस विलंब न लावता येत्या सात दिवसांत याबाबत कार्यवाही सुरु करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामुळे आता स्थानकांचा कायापालट होणार असून, प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Railway