बुलडाणा,5 फेब्रुवारी:पूर्वी चूल आणि मूल हेच महिलांचे विश्व समजलं जायचं. कदाचित पुरुषप्रधान संस्कृतीचा हा प्रभाव होता, मात्र काही समाज सुधारकांनी ही प्रथा मोडीत काढत महिलांना पुरुषाप्रमाणे समान अधिकार प्रदान केले. मात्र अजूनही काही बाबतीत पुरुषी अहंकार कायम असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. त्यातलंच एक उदाहरण म्हणजे कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेबाबत पुरुषांमध्ये अजूनही उदासीनताच आहे.
विविध बंधनाच्या चौकटीतून आणि बऱ्याच अनिष्ट रूढी-परंपरेतून महिलांची सुटका झाली खरी. मात्र, अजूनही कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियेसाठी महिलांचीच भरड सुरू असल्याचे चित्र बुलडाणा आरोग्य विभागाच्या आकडेवारीवरून समोर आले आहे. कुटुंब नियोजनासाठी महिलांसोबतच पुरुष देखील शस्त्रक्रिया करू शकतात. त्यासाठी शासनाकडून विविध माध्यमातून जनजागृती देखील करण्यात आली. मात्र, या शस्त्रक्रियेने नपुसकता येणे. जड काम न होणे असे गैरसमज असल्याने पुरुष या शस्त्रक्रियेसाठी समोर येत नसल्याचे सांगण्यात आले आहे.
काय सांगते आकडेवारी...
बुलडाणा जिल्ह्याला 2019-20 या आर्थिक वर्षात 15192 एवढं वार्षिक उद्धिष्ट देण्यात आलंय. ज्यामध्ये ग्रामीण भागासाठी 11366 तर शहरी भागासाठी 3826 एवढं उद्धिष्ट देण्यात आलंय. त्यापैकी 4216 कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. ज्यामध्ये 3561 महिला तर फक्त 41 पुरुषांचा समावेश असल्याची माहिती डॉ. राजेंद्र सांगळे (अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी,बुलडाणा) यांनी दिली आहे.
नसबंदी शस्त्रक्रिया करण्यामध्ये महिलांच्या तुलनेत पुरुषांची तुलना ही केवळ हातावर मोजण्या एवढी आहे आणि त्यातही ग्रामीण भागापेक्षा सुशिक्षिततेचे प्रमाण अधिक असलेल्या शहरी भागात याचे प्रमाण तर नगण्यच म्हणावे लागेल, पुरुषवर्ग ही शस्त्रक्रिया करून घेण्यास पुढे येत नसल्याचं आजवरच चित्र आहे, त्यामुळे शासकीय जनजागृती बरोबरच या अहंकारी पुरुषी मानसिकतेला मूठमाती देण्याची खऱ्या अर्थाने गरज आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.