शेतकऱ्यांच्या डोळ्यात कांद्याने आणलं पाणी, किलोला फक्त 2 रूपये भाव

शेतकऱ्यांच्या डोळ्यात कांद्याने आणलं पाणी,  किलोला फक्त 2 रूपये भाव

नवी मुंबईत एपीएमसीत कांद्याला फक्त 2 रूपये किलोचा भाव मिळालाय.

  • Share this:

मंगेश चिवटे, मुंबई

11 एप्रिल : मुख्यमंत्र्यांनी कालच शाश्वत शेतीवर मोठं प्रवचन दिलं, पण बाजारातली स्थिती किती भयंकर आहे याची प्रचिती आज कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आलीय. कारण नवी मुंबईत एपीएमसीत कांद्याला फक्त 2 रूपये किलोचा भाव मिळालाय. किरकोळ बाजारात मात्र सोळा रूपये किलोचा भाव असल्याचं दिसतंय. हा भाव वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळा आहे.

गरमीमुळे मोठ्या प्रमाणात कांद्याची बाजारात आवक झालीय. जवळपास दीडशे गाड्या नवी मुंबईत उभ्या आहेत. परिणामी कांदा 2 रूपये किलोनं शेतकऱ्यांना विकण्याची वेळ आलीय. तर ग्रामीण भागातील बाजार समित्यांमध्येही फारशी वेगळी परिस्थिती नाही.

नाशिक जिल्हयातील लासलगाव बाजारसमिती मध्येही कांद्याचा भाव पडला आहे. मागील वर्षा पाठोपाठ सलग यावर्षीही कांदा पिकाने शेतकऱ्यांच्या डोळ्यांत अश्रू आणले आहेत. दरम्यान, भारत सरकारने कांद्यावरील निर्य़ातबंदी तात्काळ मागे घ्यावी अशी मागणी आता शेतकऱ्यांमध्ये जोर धरू लागली आहे.

गेल्या वर्षभरापुर्वी भारत सरकारने कांदा निर्यातबंदी करण्याचा निर्णय घेउन कांद्याचे भाव नियंत्रणात आणले होते. तसेच कांद्याचे भाव स्थिर राहावेत म्हणून शेजारील पाकिस्तानातून हजारो टन कांद्याची आयात केली गेली होती. या निर्णयांमुळे देशाअंर्तगत कांद्याचे भाव पडले होते. आज वर्षभरानंतरही या परिस्थिती मध्ये काहीही फरक पडला नाही.

राज्य सरकारच्या वतीने शाश्वत शेती आणि शेतकऱ्यांना हमी भाव देऊ, अशा लोकप्रिय घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देत असले तरी केंद्राच्या शेतकरी विरोधी धोरणांमुळे शेतकरी भरडला जात आहे.

दरम्यान आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांना किमान 1200 रुपये प्रति क्विंटल भाव द्यावा किंवा प्रति क्विंटल किमान 1000 रुपये अनुदान द्यावे अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

First published: April 11, 2017, 1:21 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading