कडाक्याच्या थंडीत एका वर्षाच्या बाळाला रस्त्यावर दिलं टाकून, पुढे काय घडलं?

कडाक्याच्या थंडीत एका वर्षाच्या बाळाला रस्त्यावर दिलं टाकून, पुढे काय घडलं?

एक वर्षाच्या बालकाला त्याचे जन्मदाते जिल्ह्यातील ढालसावंगी या गावात रस्त्याच्या कडेला सोडून निघून गेले

  • Share this:

बुलडाणा, 03 डिसेंबर : बुलडाण्यामध्ये भर थंडीमध्ये जन्मदात्यांनी एका वर्षाच्या बालकाला सोडून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. खामगाव शहरात हा प्रकार उघडकीस आला.

मागील दोन-तीन दिवसांपासून तापमान कमालीचे घसरले आहे. गुलाबी थंडी बोचरी बनली आहे. त्यातच काही दिवसांपासून पहाटेपासून ढगाळ हवामान आहे. या हवामानामुळे हुडहुडी भरविणारी थंडी पहाटेपासूनच आहे. याच थंडीत नकोशा झालेल्या एक वर्षाच्या बालकाला त्याचे जन्मदाते जिल्ह्यातील ढालसावंगी या गावात रस्त्याच्या कडेला सोडून निघून गेले.

मात्र, बाळाच्या टाहोने या परिसरात रस्त्यावरून जाणारी वाहतूक थबकली. रडणाऱ्या या बाळाला पाहून उपस्थित सर्व स्तब्ध झाले. स्थानिक नागरिकांनी येथील समाजभान या सामाजिक संस्थेला माहिती दिली. त्यानंतर या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी तेथे पोहचून थंडी आणि भुकेने रडणाऱ्या या बालकाला ताब्यात घेऊन रुग्णालयात नेलं. तिथे त्याचे उपचार करून सर्व कायदेशीर सोपस्कार पाडीत समाजभान टीमचे दादासाहेब थेटे आणि खिदमते मिल्लत संस्थेचे इरफान खान पठाण यांनी मानवतेचे दर्शन घडवत त्या निराधार, निरागस मुलाला नवे आई, वडील मिळवून दिले.

खामगाव येथील ठाकरे दाम्पत्यानेही अत्यंत मायेने लेकराला जवळ घेत त्याचा स्वतःचा मुलगा म्हणून पालकत्व  स्वीकारून बाळाला मायेची ऊब दिली. समाजमन संस्था ही डॉ. प्रकाश आमटे यांच्या आंनदवन येथील लोकबिरादरी परिवाराशी जोडलेली असून ठाकरे दाम्पत्य ही लोकबिरादरी परिवाराशी जोडले असल्याने आणि ठाकरे कुटुंबीयाला मुलं नसल्याची माहिती या संस्थेला असल्यानं हा योगा योग्य जुळून आला.

ठाकरे दाम्पत्याचा एकुलत्या एक मुलाचा अपघातात मृत्यू झाला होता. खामगाव येथील सचिन ठाकरे आणि त्यांच्या पत्नी मनीषा ठाकरे या दाम्पत्यास एक मुलगा होता. मात्र, 28 मे 2014 रोजी पुणे जिल्ह्यातील इंदापूरजवळ झालेल्या अपघातात त्यांचा एकुलता एक मुलगा देवांश ठाकरे याचा मृत्यू झाला होता. आणि त्यानंतर ठाकरे दाम्पत्याला मुलं होणे कठीण असल्याने ठाकरे कुटुंब दाम्पत्य नेहमी चिंतेत आणि दुःखात होते.  अखेर या ठाकरे कुटुंबाने बाळाला दत्तक घेऊन माणुसकीचे दर्शन घडवले.

 

Published by: sachin Salve
First published: December 3, 2019, 11:18 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading