16 फेब्रुवारी : उल्हासनगर कॅम्प नंबर 1. शहरातील शहाड परिसरात रात्री उशिरा सेंच्युरी रेयॉन कंपनीत विषारी गॅस गळतीमुळे संजय शर्मा या कामगाराचा जागीच गुदमरून मृत्यू झाला आहे. यात 11 कामगारांच्या नाका तोंडात विषारी गॅस गेल्यानं त्यांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर कल्याणच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
या कंपनीत रात्री गॅस पाईपलाईनच्या दुरूस्तीचे काम सुरु होते. त्याचवेळी एका गॅसच्या पाईपलाईनमधून अचानक विषारी गॅसची गळती सुरु झाली. त्यामुळे अनेक कामगारांना त्याचा त्रास झाला. यात गुदमरून एकाचा मृत्यू तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत.
पण दरम्यान, या कंपनीच्या वतीने कामगारांना सुरक्षेच्या दृष्टीने कोणत्याही सुविधा, साहित्य पुरविण्यात आली नसल्यानं ही दुर्घटना झाल्याचा आरोप कामगारांच्या नातेवाईकांनी केला आहे.