अनिस शेख, प्रतिनिधी
लोणावळा, 07 जानेवारी : लोणावळा शहरात खळबळ उडवणाऱ्या वृद्ध महिलेच्या खून प्रकरणाचा छडा लावण्यात लोणावळा गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे. अवघ्या चार दिवसात संपूर्ण घटनेचा मोठ्या शिताफीने तपास करत राजस्थान येथून दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.
लोणावळा बाजारपेठेतील किराणा मालाचे प्रसिद्ध व्यापारी पुरुषोत्तम बंसल यांचे दुकान आहे. सहा महिन्यापूर्वी त्यांच्या दुकानात अशोक कुमार सरगरा हा कामगार कामाला होता दुपारच्या वेळेस बंसल हे अशोक कुमार याला घरून जेवणाचा डबा आणण्यासाठी पाठवत होते. याच कारणाने घरात कोठे काय ठेवले आहे याची संपूर्ण माहिती अशोक कुमार याला होती. विश्वासू कामगार असल्याने बंसल दाम्पत्य ही अशोक कुमार यास मुलाप्रमाणे सांभाळत होते.
पैशाचा मोह सुटेना
बन्सल यांच्या किराणा दुकानातून काम सोडल्याच्या 6 महिन्यानंतर पैशाच्या लोभापायी अशोक कुमार याने आपला लोणावळ्यातील दुसरा मित्र जगदीश कुमार जोदाजी याला सोबत घेत पुरुषोत्तम बन्सल यांच्या द्वारकामाई सोसायटीतील राहत्या घरात जबरी चोरी करण्याचा प्लान आखला. त्यानुसार, दिनांक 2 जानेवारी रोजी दुपारच्या सुमारास अशोक तसंच जगदीश या दोघांनी सिद्धिविनायक सोसायटीतील बन्सल यांच्या घराचा दरवाजा वाजवला घरात वयोवृद्ध रेशम बंसल या नेहमीप्रमाणे एकट्याच होत्या पूर्वी आपल्या दुकानातील ओळखीचा कामगार असल्याने रेशम यांनी दोघांना घरात बोलावलं.
ज्या माऊलीने मुलासारखं समजलं तिचाच गळा दाबला
ओळखीचा फायदा घेत विश्वासघात करत अशोक कुमार याने आमच्याकडे अर्धा भरलेला गॅस सिलेंडर आहे. तो तुम्हाला हवा आहे का? अशी विचारणा रेशीम बन्सल यांना केली आणि काही सेकंदातच दोघांनी 72 वर्षीय वृद्ध रेशम यांचा गळा आवळत त्यांचा खून केला. तसंच घरातील कपाटामध्ये ठेवण्यात आलेले दागिने तसंच रोकड एकूण 2 लाख 82 हजार रुपये घेऊन घटनास्थळावरून पोबारा केला.
दुपारच्या वेळेस जेवणाचा डबा आला नसल्याने पुरुषोत्तम बंसल हे जेवण्यासाठी घरी गेले असता खुनाचा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. त्यानुसार, लोणावळा शहर पोलिसांनी अवघ्या काही तासातच तपासाची चक्रे वेगाने फिरवत दोन्ही आरोपींची फोटो तसंच माहिती मिळवली दोन्ही आरोपी राजस्थान येथील एरसना इथं असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली.
हाडं गोठवणाऱ्या थंडीत पायपीट करून आरोपींना बेड्या
त्यानुसार, आरोपीच्या शोधात पोलिस पथक थेट राजस्थान येथील जालोर जिल्ह्यातील मेडा उपरला इथं जाऊन पोहोचले कडाक्याच्या जीवघेण्या थंडीमध्ये सलग आठ तास पायपीट करत एरसणा डोंगरावरील सांगापेरी महादेव मंदिरात लपून बसलेल्या अशोक कुमार तसंच जगदीश कुमार या दोघांना अत्यंत शिताफीने पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून घटनास्थळावरून चोरी केलेले डाग दागिने तसंच काही प्रमाणात रोकड असा 83 हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. राजस्थान वरून दोघा आरोपींना लोणावळा येथे आणण्यात आले दोन्ही आरोपींनी ओळखीचा फायदा घेत वृद्ध दाम्पत्याचा विश्वासघात करत खून केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे.
पुरुषोत्तम बंसल यांची दोन्ही मुले नोकरीसाठी पुणे इथं स्थायिक झाले आहेत. उतारवयात वृद्ध आई-वडिलांना एकटे सोडण्याच्या प्रकरणानंतर घडलेली दुःखद घटना दोन्ही मुलांच्या जिव्हारी लागली आहे. पैसा शेवटी ओळखीचा ही विश्वासघात करतो हे या संपूर्ण घटनेतून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.