OBC नेत्यांकडून समीर भुजबळ यांना आव्हान, मोर्चे थांबवण्याच्या घोषणेनंतर नवा वाद

OBC नेत्यांकडून समीर भुजबळ यांना आव्हान, मोर्चे थांबवण्याच्या घोषणेनंतर नवा वाद

आंदोलनाच्या मुद्द्यावरून व्हीजेएनटीचे बाळासाहेब सानप आणि ओबीसी संघर्ष सेनेचे प्रा. लक्ष्मण हाके यांनी समीर भुजबळांविरोधात शड्डू ठोकले आहेत.

  • Share this:

पुणे, 19 डिसेंबर : राष्ट्रवादीचे नेते आणि कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांनी यापुढे होणारे ओबीसी आंदोलन मोर्चे थांबणार असल्याची घोषणा काल औरंगाबादमध्ये केली. समीर भुजबळ यांच्या या घोषणेला इतर ओबीसी संघटनांनी तीव्र आक्षेप नोंदवला आहे.

'समता परिषद म्हणजे ओबीसी समाज नव्हे, शिवाय भुजबळांचे आंदोलन हे सरकार पुरस्कृत आंदोलन आहे,' असा आरोपही इतर ओबीसी संघटनांनी केला आहे. यापुढेही मोर्चे, आंदोलनं सुरूच राहणार असून 26 तारखेला नगरला ओबीसींचं जोरदार शक्ती प्रदर्शन होणार असून त्यामध्ये काँग्रेस नेते आणि मंत्री विजय वडेट्टीवारही सहभागी होणार आहेत.

दरम्यान, या आंदोलनाच्या मुद्द्यावरून व्हीजेएनटीचे बाळासाहेब सानप आणि ओबीसी संघर्ष सेनेचे प्रा. लक्ष्मण हाके यांनी समीर भुजबळांविरोधात शड्डू ठोकले आहेत.

मोर्चा रद्द करण्याची भूमिका मांडताना काय म्हणाले होते समीर भुजबळ?

'आजच्या नंतर होणारे ओबीसी समाजाचे सर्व मोर्चे रद्द करण्यात येत आहेत. सरकारने ओबीसी आरक्षणाला धक्का न लावण्याचे आश्वासन दिल्याने मोर्चे रद्द आहोत. त्यामुळे औरंगाबादेतील आजचा मोर्चा सरकारचे आभार मानणारा मोर्चा आहे,' अशी घोषणा समीर भुजबळ यांनी शुक्रवारी औरंगाबादमध्ये केली होती.

दरम्यान, राज्यात आरक्षणाच्या प्रश्नावरून नवा संघर्ष उभा राहिला आहे. मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिल्यानंतर पेच निर्माण झाला आहे. मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण द्या, अशी मागणी काही संघटनांनी केल्यानंतर ओबीसी नेतेही आक्रमक झाले आहेत. या सगळ्यावर राज्य सरकार नेमकं कसं उत्तर शोधणार, हे पाहावं लागेल.

Published by: Akshay Shitole
First published: December 19, 2020, 6:14 PM IST

ताज्या बातम्या