मुंबई, 9 ऑक्टोबर : आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी MPSC च्या परीक्षा पुढे ढकलल्या असल्याचे निर्णय माध्यमांशी बोलताना सांगितला. त्यानंतर तातडीने OBC आणि धनगर समाजातील नेत्यांसोबत मुख्यमंत्र्यांची बैठक सुरू होती. अखेर ही बैठक संपली असली तरी ओबीसी नेते नाराज असल्याचे समोर आले आहे. ओबीसी व धनगर समाजाच्या विविध मुद्द्यांवरीन त्यांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक सुरू होती.
मात्र यातून काही सकारात्मक बाब समोर आली नसल्याचे ओबीसी नेत्यांचे म्हणणे आहे. मागण्यांकडे दुर्लक्ष करून केवळ मंत्री उपसमिती नेमून आमच्या मागण्यांना पान पुसली आहेत. आम्हाला ओबीसी समाजासाठी निधी हवा होता त्याबाबत कोणी बोलत नाही, असा आरोप ओबीसी नेत्यांकडून केला गेला आहे. यावेळी ओबीसी नेते चंद्रकांत बावकर आणि जे दि तांडेल उपस्थित होते. माध्यमांशी बोलताना त्यांनी हा संताप व्यक्त केला.
हे ही वाचा-MPSC Exam: खासदार संभाजीराजे यांनी मानले राज्य सरकारचे आभार, म्हणाले...
मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत मराठा समाजासाठी नेमलेल्या मंत्री गट प्रमाणे ओबीसी समाजासाठी मंत्री गट स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे. ओबीसी समाज आणि मुख्यमंत्री यांच्या बैठकीतील हा महत्त्वपूर्ण निर्णय असला तरी ओबीसी नेते मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर नाराज असल्याचे दिसून आले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी MPSC ची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. आज पत्रकार परिषदेत त्यांनी ही घोषणा केली. गेल्या अनेक दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मुद्द्यांवरुन मुख्यमंत्र्यांना घेरण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यात संभाजी राजेंसह अनेकांनी एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली होती. त्यात ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली असली तरी प्रश्न अजून सुटलेला नाही. एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्याच्या निर्णयानंतर मुख्यमंत्र्यांची ओबीसी नेत्यांसोबत बैठक घेण्यात आली. यापूर्वी ओबीसी नेते एमपीएससीची परीक्षा घेण्यावर ठाम होते.