Home /News /maharashtra /

पंढरपूरच्या विठुरायाच्या भाविकांसाठी आनंदाची बातमी, आता 24 तास मिळणार विठ्ठलाचे दर्शन

पंढरपूरच्या विठुरायाच्या भाविकांसाठी आनंदाची बातमी, आता 24 तास मिळणार विठ्ठलाचे दर्शन

आषाढी आणि कार्तिकी यात्रेच्या निमित्ताने पंढरीत राज्यभरातून तसेच देशातून लाखो भाविक येत असतात.

    पंढरपूर, 2 जुलै : पंढरपुरचे विठ्ठल रुख्मिणी (Pandharpur Vithhal Rukmini) हे संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे आणि या विठोबा रखुमाईच्या भेटीसाठी संपूर्ण वारकरी आतुर झाले आहोत. दोन वर्षांनी पुन्हा आषाढी वारीला (Ashadhi Wari 2022) सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर मंदिर समितीने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पंढरपूरच्या विठुरायाच्या मंदिरात आजपासून 24 तास दर्शन व्यवस्था सुरू करण्यात आली आहे. येत्या 10 जुलैला आषाढी एकादशी आहे. दोन वर्षानंतर होणाऱ्या या यात्रेसाठी देशभरातून भाविक येणार आहेत. त्यामुळे यात्रेला येणाऱ्या जास्तीत जास्त भाविकांना पांडुरंगाचं दर्शन मिळावं यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. 24 तास दर्शन व्यवस्था सुरू करण्यात आल्यानंतर आजपासून देवाचे सर्व राजोपचार बंद करण्यात आले आहेत, अशी माहिती मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली. मंदिर दर्शनासाठी 24 तास खुले ठेवण्याची परंपरा - आषाढी आणि कार्तिकी यात्रेच्या निमित्ताने पंढरीत राज्यभरातून तसेच देशातून लाखो भाविक येत असतात. यातील जास्तीत जास्त भाविकांना देवाच्या दर्शनाचा लाभ मिळावा यासाठी मंदिर दर्शनासाठी 24 तास खुले ठेवण्याची परंपरा आहे. यासाठी देवाचा आणि रुक्मिणी मातेच्या शेजघरातील पलंग काढून ठेवण्यात येतो. आज सकाळीही 11 वाजता विठ्ठल रुक्मिणीचा पलंग बाहेर काढण्यात आला आहे. त्यामुळे आता आषाढी यात्रा संपेपर्यंत देव झोपायला जाणार नाहीत, अशी प्रथा आहे. हेही वाचा - आषाढी एकादशीला पंढरपूरला जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, रेल्वेकडून ही घोषणा मऊ कापसाचा लोड आणि तक्क्या लावण्याची परंपरा मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते पूजेनंतर आज विठुरायाच्या पाठीला लोड तर रुक्मिणी मातेच्या पाठीला तक्क्या लावण्यात आला. 24 तास दर्शनाला उभारुन देवाला शिणवटा जाणवू नये, यासाठी विठ्ठल रुक्मिणीच्या पाठीला मऊ कापसाचा लोड आणि तक्क्या लावण्याची परंपरा आहे. नेहमी पांडुरंगाच्या राजोपचाराला पहाटे 4 वाजल्यापासून सुरुवात होत असते. ती रात्री शेजारतीपर्यंत म्हणजे रात्री साडेअकरा वाजेपर्यंत चालते. त्यानंतर मंदिर बंद होत असते. मात्र, आता देवाचा पलंग निघाल्यामुळे दिवसभरात सकाळी देवाचे स्नान नित्यपूजा, दुपारी महानैवेद्य आणि संध्याकाळी लिंबूपाणी एवढ्यासाठी दर्शन बंद राहणार आहे. लाखो वारकरी हरीनामाच्या गजरात पंढरीच्या दिशेने निघाले आहेत. दोन वर्षांनंतरच वारी होणार असल्याने लाखो भाविक पंढरपुरात दाखल होणार आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Ashadhi Ekadashi, Wari

    पुढील बातम्या