अमोल गावंडे, (प्रतिनिधी)
बुलडाणा, 18 जुलै- सुप्रसिद्ध वऱ्हाडी कादंबरीकार पुरुषोत्तम बोरकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील सुटाळा बु येथील राहत्या घरी बुधवारी रात्री आठ वाजता बोरकरांची प्राणज्योत मालवली. ते 63 वर्षांचे होते. त्यांच्यावर पार्थिवावर गुरुवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर, नाट्य कलावंत दिलीप देशपांडे, पी.आर.राजपूत यांच्यासह अनेक साहित्यिक, कलावंत, लेखक, पत्रकारांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार पार पडले.
आपल्या आगळ्यावेगळ्या अस्सल वऱ्हाडी लिखाणाच्या माध्यमातून ते प्रसिद्ध होते तर ग्रामीण भागाचे त्यांच्याच भाषेत वास्तव मांडणारी 'मेड इन इंडिया' ही कादंबरी चांगलीच गाजली होती. त्यांच्या 'मेड इन इंडिया' या कादंबरीवर चित्रपटही निघणार होता. याच कादंबरीवर 1990 मध्ये नागपूर आकाशवाणीवर तीन महिने नाटकीय सादरीकरणही करण्यात आले होते. 'आमदार निवास 1756', '15 ऑगस्ट भागीला 26 जानेवारी' यासारख्या कांदबरीसह गझल, चरित्रात्मक लिखाण त्यांनी केले. नोकरी नसल्याने नंतरच्या काळात त्यांनी केवळ लिखाणच केले, कविताही केल्या. 15 ते 20 गझलाही लिहिल्या. 10 ते 15 चरित्रात्मक पुस्तकांचे त्यांनी लेखन केले. काही वृत्तपत्रासाठी देखील त्यांनी लिखाण केले. त्यांच्या लिखाणावर त्यांना अनेक पुरस्कार देखील मिळालेत. पडद्या आड गेलेल्या अशा या अस्सल वऱ्हाडी साहित्यिकाचे वऱ्हाडी भाषेच्या संवर्धनासाठीचे योगदान कायम स्मरणात राहील, अशा भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केल्या.
औरंगाबादेत MIM नगरसेवकांनी विरोधी पक्षनेत्याच्या कार्यालयात खाल्ले डबे