मुंबई, 1 ऑक्टोबर : उत्तर प्रदेशात हाथरस इथल्या बलात्कार प्रकरणाने साऱ्या देशाचं लक्ष वेधून घेतलं. दलित मुलीचा या निर्दयी घटनेत मृत्यूही झाला आणि खळबळ उडाली. उत्तर प्रदेश सरकार अडचणीत येईल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. पण हाथरसची घटना काही पहिली नाही. आपल्या महाराष्ट्रातच बलात्कार आणि खुनाची देशातली सर्वाधिक प्रकरणं नोंदली गेली आहेत.
राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या (National Crime Record Bureau)च्या नोंदींनुसार बलात्कार आणि खुनाच्या सर्वाधिक 47 घटना महाराष्ट्रात घडल्या आहेत. देशात या प्रकारचे सर्वाधिक गुन्हे आपल्याच राज्यात घडले आहेत. याशिवाय लाजिरवाणी बाब म्हणजे बाल लैंगिक अत्याचार आणि सार्वजनिक वाहतुकीदरम्यान झालेले लैंगिक अत्याचारातही महाराष्ट्रात पुढे आहे, ही बातमी इंडियन एक्स्प्रेसने दिली आहे.
सार्वजनिक वाहतुकीच्या ठिकाणी झालेले लैंगिक अत्याचार मुंबई आणि पुण्यात सर्वाधिक झाले आहेत. त्यानंतर दिल्लीचा क्रमांक लागतो. 2019 च्या NCRB च्या नोंदींवरून ही धक्कादायक बाब उजेडात आली आहे.
स्त्रियांविरोधातल्या अत्याचाराची सर्वाधिक प्रकरणं उत्तर प्रदेशात नोंदली गेली आहेत. NCRB च्या आकडेवारीनुसार 2019 मध्ये मुंबई पोलिसांनी महिला अत्याचाराच्या 6519 घटना नोंदवल्या. हा आकडा दुसऱ्या क्रमांकाचा आकडा आहे. दिल्लीत सर्वाधिक 12,902 घटना नोंदल्या गेल्या.
उत्तर प्रदेशातील हाथरस येथील 19 वर्षीय दलित तरुणीवर सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली. दिल्ली येथील सफदरजंग हॉस्पिटलमध्ये (Safdarjung Hospital Delhi) उपचार सुरु असतानाच पीडितेची प्राणज्योत मालवली. आता पीडितेचा पोस्टमार्टम रिपोर्ट (Postmortem Report) समोर आला आहे. त्यातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामध्ये मुलीची जीभ कापण्यात आली होती व शिवाय तिच्या शरीरावर मारहाणीच्या खुणा असल्याचीही माहिती समोर आली होती.
काँग्रेस नेते राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांनी योगी सरकारविरोधात आंदोलन छेडलं. बलात्कार पीडित मुलीच्या नातेवाईकांची भेट घ्यायला ते निघाले असताना पोलीसांनी अडवून त्यांना अटक केली. त्यामुळे सारा देश सध्या हाथरस प्रकरणावर बोलत आहे. अशा कितीतरी घटना देशभरात घडत आहेत. निर्भया प्रकरणानंतर डोळे उघडले तसे पुन्हा एकदा हाथरस प्रकरणाने महिला अत्याचाराविषयी खाडकन डोळे आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.