नगरपालिकेत राडा; ज्येष्ठ नगरसेवकाला धक्काबुक्की, सोशल डिस्टन्सिंगचाही उडाला फज्जा

नगरपालिकेत राडा; ज्येष्ठ नगरसेवकाला धक्काबुक्की, सोशल डिस्टन्सिंगचाही उडाला फज्जा

दौंड नगरपालिकेमधील सरकारी कार्यालयातच ही घटना घडल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

  • Share this:

सुमित सोनवणे, दौंड, 27 ऑक्टोबर : दौंड नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दौंडमधील एका प्रभागामध्ये रस्त्याचे काम होत नाही, असा आरोप करत विना परवानगी धडक मोर्चा काढण्यात आला. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचा चांगलाच फज्जा उडाला. तसंच नगरपालिकेतील राष्ट्रवादीच्या गटनेत्याला धक्काबुक्की देखील करण्यात आली.

दौंड नगरपालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नगरसेवक बादशाह शेख यांना धक्काबुक्की केल्याची घटना थेट दौंड नगरपालिकेतच घडली. दौंड नगरपालिकेमधील सरकारी कार्यालयातच ही घटना घडल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

रस्त्याच्या प्रश्नावर धडक मोर्चा काढणाऱ्या तरुणांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते असलेल्या नगरसेवकाला विकासकामे का होत नाही, असं म्हणत जाब विचारला. तसंच त्यानंतर या तरुणांकडून आक्रमक होत धक्काबुक्की करण्यात आली. या घटनेमुळे शहरातील राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली. थेट गटनेत्याला धक्काबुक्की करण्यात आल्याचा आरोप होत असल्याने या प्रकरणाची चांगलीच चर्चा होत आहे.

दुसरीकडे, ज्या जबाबदार लोकप्रतिनिधींकडून नियमांचं पालन करण्याची अपेक्षा केली जाते त्यांच्याकडूनच हमरीतुमरीची भाषा वापरली गेल्याचं पाहायला मिळालं. तसंच नगरपालिकेत जमाव गोळा झाल्याने कोरोना काळात सोशल डिस्टन्सिंगचेही तीन तेरा वाजले. त्यामुळे संबंधितांवर नगरपालिका प्रशासन कारवाई करणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

Published by: Akshay Shitole
First published: October 27, 2020, 11:40 PM IST
Tags: pune news

ताज्या बातम्या