पावसाअभावी राज्यात दुबार पेरणीचं संकट

पावसाअभावी राज्यात दुबार पेरणीचं संकट

शेतकऱ्यांची पिकं करपू लागल्यामुळे त्यांच्यावर दुबार पेरणीचं संकट ओढावलंय.

  • Share this:

09 जुलै : गेल्या 20 दिवसांपासून पावसाने पाठ फिरवल्यामुळे राज्याच्या काही भागात शेतकऱ्यावर दुबार पेरणीचं संकट आलंय. पावसाअभावी येवला तालुक्यातील रेंडाळेत मका आणि कापसाची पिकं करपल्याने त्याच्यावर नांगर फिरवण्याची वेळ शेतकऱ्यावर आलीय. हीच अवस्था इतर शेतकऱ्यांचीही असून त्यांची पिकं करपू लागल्यामुळे त्यांच्यावर दुबार पेरणीचं संकट ओढावलंय.

येवला तालुक्यातील रेंडाळे गावच्या दीपक आहेर यांनी पावसाअभावी आपल्या ३ एकरांवर लावलेल्या सोयाबिनवर नांगर फिरवलाय. तर रामेश्वर आहेर या शेतकऱ्यानं २ एकरात कपासीची पेरणी केली होती. पण पावसानं दडी मारल्यामुळे पिकं करपू लागल्याने ते जगवण्यासाठी पिकाला तांब्याने पाणी देण्याची वेळ शेतकऱ्यावर आलीय.

तर उस्मानाबादमध्ये पावसाच्या जोरावर शेतकऱ्यांनी पेरणी केली. मात्र गेल्या 15 ते 20 दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे  शेतातील सोयाबीन आणि इतर पिकं करपण्यास सुरुवात झाली आहेत, पेरणी केलेलं धान्य अपेक्षित प्रमाणात उगवून न आल्यानं शेतकरी संकटात आला आहे.

विदर्भात आधीच उशीराने दाखल झालेल्या पावसाने सर्वाधिक पावसाच्या जुलै महिन्यातच दडी मारल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आलंय.  विदर्भातील सर्वच जिल्ह्यात आठवडाभरापासून पाऊस नसल्याने थोडेफार उगवलेले रोपटे जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे.

कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार ६ जुलैपर्यंत नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांत ३२.३७ टक्के तर अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांत केवळ ३२.७५ टक्के पेरण्या आटोपल्यात. विदर्भात १६ लाख हेक्टरवर कापूस, पाच लाख हेक्टरवर तूर तर आठ लाख हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झालीय. मात्र मागील आठ दिवसांपासून पाऊस पडलेला नसल्याने पीकं करपायला सुरुवात झाली.

विदर्भातील जिल्हावार पेरणीची आकेडवारी  

१) नागपूर - ३५.१२ टक्के

२) वर्धा - ५७.८१ टक्के

३) भंडारा - २.०८ टक्के

४) गोंदिया- १.७९ टक्के

५) चंद्रपूर - ४०.७४ टक्के

६) गडचिरोली - ७.६९ टक्के

७) अमरावती - ४३ टक्के

८) अकोला - ४५ टक्के

९) बुलडाणा - ७१टक्के

१०) वाशिम - ८२ टक्के

११) यवतमाळ - ९२ टक्के

 

First published: July 9, 2017, 3:29 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading