मुंबई, 16 फेब्रुवारी : माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण भाजपमध्ये जातील, अशा चर्चा गेल्या कित्येक महिन्यांपासून सुरू आहेत. एकनाथ शिंदे यांच्या विश्वासदर्शक ठरावावेळी काँग्रेसचे 11 आमदार गैरहजर होते, त्यातही अशोक चव्हाणांचं नाव होतं, तेव्हाही अशोक चव्हाण भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा झाल्या, पण अशोक चव्हाणांनी या चर्चा फेटाळून लावल्या.
आता भाजपकडून अशोक चव्हाण यांना खुली ऑफर देण्यात आली आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांनी अशोक चव्हाणांना ही ऑफर दिली आहे. काँग्रेसचं काही भविष्य राहिलं नाही, अशोक चव्हाणांनीही आता विचार करायला हवा, असं मत राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केलं आहे. अशोक चव्हाण सक्षम नेते आहेत, तसंच जगाने मोदींचं नेतृत्व स्वीकारलं आहे, अशी प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी दिली आहे.
'काँग्रेसकडून लोकांच्या फार अपेक्षा राहिलेल्या नाहीत, त्यामुळे अशोकरावांनीही त्यांच्या भूमिकांचा पुनर्विचार करायला हरकत नाही,' असं राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले आहेत. राधाकृष्ण विखे पाटील हेदेखील 2019 निवडणुकीआधी काँग्रेसमध्ये होते, पण अहमदनगर लोकसभा मतदारसंघ काँग्रेसला सोडायला राष्ट्रवादी तयार झाली नाही, त्यामुळे राधाकृष्ण विखे पाटील आणि त्यांचे पूत्र सुजय विखे पाटील भाजपमध्ये गेले. या मतदारसंघातून सुजय विखे पाटील भाजपच्या तिकीटीवर निवडून गेले. तर विधानसभा निवडणुकीत राधाकृष्ण विखे पाटील यांचाही विजय झाला. 2019 निवडणुकीआधी काँग्रेसमध्ये असलेले राधाकृष्ण विखे पाटील विधानसभेचे विरोधी पक्षनेते होते.
काँग्रेसमधला अंतर्गत वाद चव्हाट्यावर असतानाच राधाकृष्ण विखे पाटील यांनी अशोक चव्हाणांना भाजपमध्ये यायची ऑफर दिली आहे. नाशिक पदवीधर पोटनिवडणुकीमध्ये सुधीर तांबे, सत्यजीत तांबे यांच्या बंडानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांच्यात वाद झाला. नाना पटोलेंसोबत काम करणं शक्य नसल्याचं पत्र बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस हायकमांडला पाठवलं होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ashok chavan, BJP, Congress, Radha krishna vikhe patil