वीरेंद्रसिंह उत्पात, पंढरपूर, 4 फेब्रुवारी : 'राष्ट्रवादीचे क्राँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे देव, धर्म मानत नाही. त्यांनी समर्थ रामदास यांचा एकेरी उल्लेख केला आहे. त्यामुळे त्यांनी धार्मिक कार्यक्रमांना व्याख्यानाला कशासाठी बोलवता? फक्त पैसा आणि प्रसिद्धीसाठी अशा लोकांना कार्यक्रमांना बोलवू नका,' असे आवाहन निवृत्ती महाराज वक्ते यांनी पत्रकाद्वारे केले आहे. वक्ते महाराज हे राष्ट्रीय वारकरी परिषदेचे संस्थापक आहेत.
'ज्यांना हिंदू धर्माबद्दल आदर आहे व ज्यांना धर्मासाठी काम करण्याची मनापासून इच्छा आहे अशा हिंदू धर्माभिमानी राज्यकर्त्यांनाच धार्मिक कार्यासाठी बोलवावे. शरद पवार मुख्यमंत्री असताना महापुजेसाठी गैरहजर राहिले होते. संत तुकाराम महाराज सदेह वैकुंठ कधीच गेले नाहीत, संत ज्ञानेश्वरांनी संजिवनी समाधी घेतली नाही असे मत मांडणारे तथाकथित पुरोगामी लेखकांना पवारांचा पाठिंबा असतो. अशा लोकांना सद्गुरू जोग महाराज शताब्दी महोत्सवाला बोलवण्यापेक्षा खऱ्या धर्माभिमानी हिंदू पुरस्कर्ते राजकीय व्यक्तीला आमंत्रित करावे,' असे आवाहन निवृत्ती महाराज वक्ते यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात केले आहे.
वारकरी संप्रदायातील हभप वा.ना महाराज उत्पात यांनीही शरद पवारांना रामशास्त्री प्रभुणे यांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार देण्यास विरोध दर्शवला होता. वारकरी संप्रदायातील जेष्ठ महाराजांनी थेट शरद पवारांना स्पष्ट विरोध केल्यामुळे महाराष्ट्रातील सामाजिक आणि राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.