मोदींवरील टीकेच्या चर्चांवर नितीन गडकरींनी केला खुलासा

मोदींवरील टीकेच्या चर्चांवर नितीन गडकरींनी केला खुलासा

नितीन गडकरी हे अप्रत्यक्षपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधत आहेत, असंही बोललं जात आहे. यातच आता नागपुरातील एका कार्यक्रमात बोलताना गडकरींनी या चर्चांबाबत भाष्य केलं आहे.

  • Share this:

नागपूर, 2 फेब्रुवारी : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची गेल्या काही दिवसांतील विधानं देशाच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरत आहेत. नितीन गडकरी हे अप्रत्यक्षपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधत आहेत, असंही बोललं जात आहे. यातच आता नागपुरातील एका कार्यक्रमात बोलताना गडकरींनी या चर्चांबाबत भाष्य केलं आहे.

'माझ्या बोलण्यावरून माध्यमं वेगळा अर्थ लावतात आणि माझ्यावर टीका करतात. पण ज्या झाडाला फळे लागतात त्यांनाच दगड मारले जातात,' असं म्हणत नितीन गडकरींनी या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे. ईक्यु स्पार्क या तरुण उद्योजकांच्या परिषदेत गडकरी बोलत होते.

'काम केले तरच मत द्या, नाहीतर नका देऊ'

'राजकारणातील मंत्रिपद हे क्षणिक आहे. काम केले तर मत द्या नाही तर देऊ नका, या तत्वावर मी काम करतो,' असंही नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, नितीन गडकरी हे त्यांच्या स्पष्टोक्तपणासाठी ओळखले जातात. गेल्या काही दिवसांत त्यांनी केलेल्या अनेक विधानांवरून देशाच्या राजकारणात वादळ निर्माण झालं होतं.

'...तर लोक ठोकून काढतात'

'स्वप्नं दाखवणारे नेते लोकांना आवडतात, पण स्वप्न पूर्ण न करणाऱ्या नेत्यांना जनताच ठोकून काढते', असं वक्तव्य भाजपचे नेते आणि केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी केलं होतं. मुंबई भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा पार पडला. या कार्यक्रमात अभिनेत्री ईशा कोप्पीकर हीने भाजपात प्रवेश केला. यावेळी बोलताना नितीन गडकरींनी पुन्हा एकदा एक सूचक विधान केलं होतं.

"कोणतेही स्वप्न असतं, ते ह्रदयात असतं. कोणतीही सत्ता डोळे वटारू शकते. पण कुणांच्या स्वप्नांना संपवू शकत नाही. स्वप्नांचं आणखी एक विशिष्ट असतं, जी लोकं स्वप्न दाखवत असता, पण ती पूर्ण करत नाही. अशा नेत्यांची जनता धुलाई करते. त्यामुळे स्वप्न असे दाखवा जे पूर्ण करता येऊ शकतात.", असं गडकरी म्हणाले होते. तसंच 'मी स्वप्नं दाखवणारा मंत्री नाही तर मी काम करुन दाखवणारा मंत्री आहे,' असंही ते म्हणाले.

गडकरींकडून इंदिरा गांधींचं कौतुक

गडकरींनी याआधीही अशी विधानं केली होती. नागपूरमध्ये झालेल्या एका कार्यक्रमामध्ये, 'इंदिरा गांधी यांनी अनेक ताकदवान नेत्यांना झुकवलं आणि आपलं कर्तृत्व सिद्ध केलं,' असं म्हणत गडकरी यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचं कौतुक केलं होतं. तसंच याआधी गडकरींनी माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचंही कौतुक केलं होतं.

'विजयाचे बाप अनेक असतात, पराभव अनाथ असतो'

पुण्यात 22 डिसेंबर रोजी झालेल्या एका कार्यक्रमात गडकरी म्हणाले होते की, 'अपयशाची जबाबदारी घ्यायला नेतृत्त्वानं शिकलं पाहिजे. यशाचे बाप अनेक असतात पण अपयश अनाथ असतो. अपयश आल्यावर कमिटी बसते तर विजयावर आनंद व्यक्त केला जातो. मात्र, अपयशाची जबाबदारी घ्यायला नेतृत्त्वानं शिकलं पाहिजे.'

VIDEO : विजयाचे बाप अनेक असतात, पराभव अनाथ असतो -नितीन गडकरी

First published: February 2, 2019, 6:45 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading