नितेश राणे यांनी कंगनाप्रकरणी ट्वीट करून उद्धव ठाकरे सरकारला पुन्हा डिवचलं!

नितेश राणे यांनी कंगनाप्रकरणी ट्वीट करून उद्धव ठाकरे सरकारला पुन्हा डिवचलं!

आता असं वाटतंय की यांच्या मुलांची लग्नही आपल्याच पैशातून होतील...

  • Share this:

मुंबई, 28 ऑक्टोबर: भाजपचे आमदार नितेश राणे यांनी ट्वीट करून पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारवर डिवचलं आहे. बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतविरुद्धच्या (Kangana Ranaut)खटल्यासाठी मुंबई महापालिकेने (BMC)आतापर्यंत तब्बल 82 लाख 50 हजार रुपयांचा खर्च केला आहे. ही धक्कादायक बाब माहिती अधिकार कायद्यातंर्गत माहिती समोर आली आहे. यावरुन आमदार नितेश राणे यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे.

'पेंग्विन आणि कंगना रणौतच्या प्रकरणी काम करणाऱ्या वकीलासाठी मुंबईकर कर भरतात. आणखी काय शिल्लक आहे? आता असं वाटतंय की यांच्या मुलांची लग्नही आपल्याच पैशातून होतील', असं ट्वीट करून नितेश राणे यांनी सरकारला टोला लगावला आहे.

हेही वाचा...

दरम्यान, अभिनेत्री कंगना रणौत आणि मुंबई महापालिका हा वाद आता नवा नाही. पण, या प्रकरणी नवनवीन माहिती समोर येत आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी (Sushant Singh Rajput Death Case) केलेल्या वक्तव्यावरून कंगनाच्या ऑफिसची मुंबई महापालिकेकडून तोडफोड करण्यात आली होती. दरम्यान, कंगना VS बीएमसी या खटल्यात महापालिकेनं आतापर्यंत 82 लाख 50 हजार खर्च केल्याची माहिती समोर आली आहे.

काय आहे प्रकरण?

मुंबई महापालिकेने कंगनाचे वांद्रे येथील पाली हिल येथील कार्यालय तोडल्याचं प्रकरण न्यायालयात गेलं आहे. सुशांतप्रकरणी केलेल्या वक्तव्यानंतर कंगनाविरुद्ध शिवसेना या वादाला सुरुवात झाली. त्यानंतर पालिकेने ‘एच-पश्चिम’ विभाग कार्यालयाने पाली हिल याठिकाणी कंगना रणौतच्या कार्यालयात अनधिकृत बांधकाम असल्याचा आरोप करत हातोडा चालवला.

कंगनानं याप्रकरणी कोर्टात धाव घेतली आहे. याकरता पालिकेची बाजू ज्येष्ठ वकील, वरिष्ठ अधिवक्ता अस्पी चिनॉय मांडत आहेत. या लढ्यासाठी पालिकेने आतापर्यंत 82 लाख 50 हजार खर्च केले आहेत. चिनॉय यांनी आतापर्यंत 11 वेळा पालिकेची बाजू मांडली आहे. प्रत्येक तारखेसाठी त्यांनी आकारलेल्या 7 लाख 50 हजार शुल्कानुसार पालिकेला इतकी रक्कम मोजावी लागली आहे.

शरद यादव यांनी विधि खात्याकडे माहितीचा अधिकार कायद्याअंतर्गत (Right to Information Act) याबाबत माहिती मागितली होती. कंगना विरुद्ध मुंबई महापालिका लढाईत अस्पी चिनॉय यांना किती रक्कम देण्यात आली,याबाबत ही माहिती मागवली होती. त्यात 82 लाख 50 हजार खर्च झाल्याचे समोर आले आहे.

कंगनानं ओढले ताशेरे

अभिनेत्री कंगना रणौत हिने देखील पालिकेच्या या खर्चावरून बीएमसीवर ताशेरे ओढले आहेत. तिने असे म्हटले आहे की, 'माझे घर बेकायदेशीरपणे तोडण्यासाठी महापालिकेने आतापर्यंत 82 लाख खर्च केले आहेत. एका मुलीला त्रास देण्यासाठी पप्पू एवढे पैसे खर्च करत आहेत. आज अशाठिकाणी महाराष्ट्र आहे, हे दुर्भाग्यपूर्ण आहे.'

Published by: Sandip Parolekar
First published: October 28, 2020, 12:26 PM IST

ताज्या बातम्या