रत्निगिरी, 27 जानेवारी : मुंबईच्या (Mumbai) मालाड (Malad) येथील क्रिडा संकुलाला टिपू सुलतान नाव देण्यावर नवा राजकीय वाद उफाळला आहे. भाजपने या नावाला प्रचंड विरोध केला आहे. विशेष म्हणजे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्याकडून या नावाचं समर्थन करण्यात आलं आहे. तर मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख (Aslam Shaikh) हे या नावासाठी आग्रही आहेत. त्यामुळे याच मुद्द्यावरुन माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी नवाब मलिक यांच्यावर सडकून टीका केली आहे. "नवाब मलिक हे माणूस आहेत? त्यांनी तिकडे पाकिस्तानमध्ये जावं. तिकडे टिपू सुलतान नावाचा रस्ता आहे", अशी बोचरी टीका निलेश राणे यांनी केली. "नवाब मलिक हे कौशल्य विकासमंत्री असून त्यांनी आपल्या मंत्रीपदाचा फायदा जावयाला ड्रग्ज केसमधून बाहेर काढण्यासाठी केला" असे म्हणत "त्यांच्या मतदारसंघात काय परिस्थिती आहे हे एकदा जाऊन पहा", असेही ते म्हणाले.
निलेश राणे नेमकं काय म्हणाले?
"नबाव मलिक माणूस आहेत का? ते काय लेव्हलचे आहेत? पाकिस्तानात टिपू सुलतान नावाचा रोड आहे. तिकडे जा. इकडे काय करताय? नवाब मलिक हे कौशल्य विकास मंत्री आहेत. ते त्यांचं सगळं कौशल्य त्यांचे जावई जे ड्रग्स प्रकरणात अडकले होते त्यांना बाहेर काढण्यात गेलं. हे ते नवाब मलिक. त्यांच्या मतदारसंघात तुम्ही गेलात तर अग्निशमन दलाची गाडी जाऊ शकत नाही. पाणी चोरी होती. झोपडपट्ट्या बनवल्या जातात. हेच बनवतात, हेच विकतात. हेच ते बिल्डर. ते हेच बोलू शकतात. त्यांना त्यासाठीच ठेवलं आहे", असा घणाघात निलेश राणे यांनी केला.
(औरंगाबादमध्ये स्वागताला प्रचंड गर्दी, आदित्य ठाकरे म्हणतात, बाबा रागवतील)
"तिकडे संजय राऊत आणि इकडे नवाब मलिक. हे दोन कोंबडे झुंजताहेत रोज. त्याचीच स्पर्धा महाराष्ट्रात चाललीय. महाराष्ट्रात विकासावर कुठे चर्चा होते? रोज ते काहीतरी नवे टूम काढणार आणि मग त्यावर दिवसभर चर्चा होत राहणार. महाराष्ट्राची चर्चा राहिली बाजूला, टिपू सुलतान मेला-जीवंत आहे, आम्हाला काय करायचंय? परत जीवंत होईल कधी तर आम्ही काय करु? तुम्हाला मुख्य विषय बाजूला ठेवायचे आहेत. टिपू सुलतान अमूक-टमूक यामध्येच महाराष्ट्राला ठेवायचं आहे. महाविकास आघाडीचं सरकार येणं हे महाराष्ट्राचं दुर्भाग्य आहे", अशा खोचक शब्दांमध्ये निलेश राणे यांनी टीका केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.