सिंधुदुर्ग, 7 जुलै : मुंबई महानगरपालिकेतील युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढत्या हस्तक्षेपाबाबत गेल्या काही दिवसांपासून चर्चा होत आहे. आता याच मुद्द्यावरून माजी खासदार निलेश राणे यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे.
'पालिकेतील विरोधी पक्षातल्या एका नगरसेवकांनी पोलिसांकडे तक्रार करा. कलम 353 खाली बघा आदित्य ठाकरे पालिकेत यायचे बंद होतात की नाही. या ठाकरे बाप आणि मुलाच्या नावावर नाहीतरी एक पण केस नाही आणि केस घेण्याची धमक सुद्धा नाही,' असं ट्वीट करत निलेश राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे.
शिवसेना Vs राणे
अभियंत्याला शिवीगाळ आणि चिखलफेक केल्याप्रकरणी आमदार नितेश राणे यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यानंतर नितेश यांचे बंधू आणि माजी खासदार निलेश राणे यांनीही शिवसेना मंत्र्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली.
'रस्त्यांच्या खराब स्थितीविरोधात आंदोलन केल्यानंतर नितेश राणेंवर कारवाई करण्यात आली. मात्र ज्यांच्या कारभारामुळे तिवरे धरण फुटून 23 लोकांचा जीव गेला त्या शिवसेना आमदारांवर कारवाई का होत नाही. आणि शिवसेनेचे मंत्री म्हणतात खेकड्यांमुळे धरण फुटलं. असं कारण सांगणाऱ्या मंत्र्याला चपलांचा हार घालावा वाटतो,' असं म्हणत निलेश राणे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
नितेश राणेंचा राडा
मुंबई-गोवा हायवेवरील खड्ड्यांविरोधात कणकवलीचे आमदार नितेश राणे यांनी गुरुवारी (4 जुलै)रोजी आक्रमक आंदोलन केलं. तसंच नितेश यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह मिळून अभियंता प्रकाश शेडेकर यांच्या अंगावर चिखलाचे पाणी ओतले. इतकंच नाही तर शेडेकर यांना शिवीगाळ करत खांबाला बांधून ठेवण्याचा प्रयत्नदेखील केला. या प्रकारामुळे नितेश राणेंवर चौफेर टीका केली जात आहे. नितेश यांचे वडील आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनीदेखील घडल्या प्रकारावर नाराजी व्यक्त केली. याबाबत नारायण राणे यांनी स्वतः माफीदेखील मागितली. तसंच 'नितेशनं केलेलं कृत्य चुकीचं होतं. मी त्याचं समर्थन करत नाही',असंही राणे यांनी म्हटलं.
VIDEO: ...जेव्हा खासदार नवनीत राणा थेट शेतात जाऊन हाती नांगर घेतात