'एल्गारचा तपास NIA कडे देणं संशयास्पद....' थोरात यांचं धक्कादायक विधान

'एल्गारचा तपास NIA कडे देणं संशयास्पद....' थोरात यांचं धक्कादायक विधान

'नरेंद्र दाभोलकर, कलबुर्गी, पानसरे अशा विचारवंतांची हत्या झाली. आता आंबेडकरवादी विचारवंतांना नक्षलवादी ठरवण्याचा हा प्रयत्न आहे असं वाटतं,' असं थोरात म्हणाले.

  • Share this:

मुंबई, 18 फेब्रुवारी : पुण्यात एल्गार परिषदेच्या कार्यक्रमाविषयीचा तपास राष्ट्रीय तपास संस्थेकडे (NIA ) देण्यास काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा तीव्र विरोध होता. त्यांनी तो बोलूनही दाखवला होता. तरीही कायद्यानुसार ठाकरे सरकारने NIA कडे तपास सोपवला. काँग्रेसची NIA तपासाबद्दलची खदखद बाळासाहेब थोरात यांच्या वक्तव्यातून पुन्हा एकदा व्यक्त झाली आहे. त्यांनी या प्रकरणी जाहीरपडे धक्कादायक विधान केलं. NIA कडे तपास सोपवण्याचा निर्णय आत्ताच का घेतला गेला, आताची वेळ आणि परिस्थिती पाहता संशयाला वाव आहे, असं थोरात म्हणाले. पुरोगाम्यांचा आवाज दडपण्याचा हा प्रयत्न नाही ना, असा प्रश्न पडतो. म्हणूनच NIA कडे तपास दिल्याने काळजी वाटते, असं थोरात म्हणाले.

भीमा कोरेगावच्या प्रकरणार एल्गार परिषदेची भूमिका काय होती याविषयी तपास स्वतंत्रपणे सुरू आहे. एल्गार परिषदेशी संबंधित काही व्यक्तींची चौकशीही झाली आणि आता NIA ती नव्याने करू शकते. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी NIA कडे तपास देणं संशयास्पद असल्याचं म्हटलं आहे. हा निर्णय काळजी वाढवणारा आहे, असंही ते म्हणाले. "एल्गार हे पुरोगामी व्यासपीठ होतं. या व्यासपीठावरचे सगळे कवी आणि विचारवंत होते. त्यांच्याविरोधात काही पुरावा असेल तर आम्ही बाजू घेणार नाही. पण  त्यांची अशी चौकशी करणं म्हणजे विचारवंतांचा विचार दाबण्याचा प्रयत्न आहे का, असा प्रश्न पडतो आहे. नरेंद्र दाभोलकर, कलबुर्गी, पानसरे अशा विचारवंतांची हत्या झाली. आता आंबेडकरवादी विचारवंतांना नक्षलवादी ठरवण्याचा हा प्रयत्न आहे असं वाटतं. म्हणून काळजी वाटते", असं थोरात म्हणाले.संपूर्ण महाराष्ट्र, सगळा देश याकडे संशयाच्या नजेरेने पाहतो आहे, असंही थोरात म्हणाले.

'एल्गार'च्या चौकशीवरून राज्य आणि केंद्रात खडाजंगी, SIT चौकशी होणारच

एकीकडे थोरात यांनी NIA विरोधात स्पष्ट भूमिका घेतली असताना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हेसुद्धा भिडे एकबोटेंमुळेच भीमा कोरेगावची घटना घडल्याचा शरद पवार वारंवार पुनरुच्चार करत आहेत.

काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांनी भीमा-कोरेगाव तपासाच्या मुद्द्यावरुन मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केलं होतं. ‘आपण (महाविकास आघाडीमध्ये) सहकारी आहोत. त्यामुळे यांसारख्या महत्त्वाच्या बाबींवर चर्चा केल्याशिवाय निर्णय घेणं अयोग्य आहे. तुमच्याकडे (उद्धव ठाकरेंकडे) सत्ता असेल पण त्याचा वापर कायदेशीररित्या होणं आवश्यक आहे.’ अशी प्रतिक्रिया खर्गे यांनी दिली होती.

महाविकास आघाडीमध्ये बिघाडी, भीमा-कोरेगाव तपासावरून पवारांनतर खर्गेंचीही उद्धव ठाकरेंवर टीका

'एल्गार' परिषदेवरून केंद्र आणि राज्य सरकार आमने-सामने आलंय. दोन्ही सरकारांमध्ये खडाजंगी झाली असून या प्रकरणाची SIT चौकशी होणारच असं राष्ट्रवादीने जाहीर केलंय. शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची बैठक झाली. त्यात पवारांनी राष्ट्रवादीकडे असलेल्या सर्व खात्यांचा आढावा घेतला अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली. ते म्हणाले, NIAला या प्रकरणाची चौकशी करण्याचा अधिकार आहे आणि त्यानुसारच मुख्यमंत्र्यांनी तो निर्णय घेतला असावा. मात्र NIAच्याच नियमांनुसार कलम 10 अंतर्गत राज्य सरकारला समांतर चौकशी करण्याचा अधिकार आहे. त्यानुसार ही चौकशी होणारच आहे.

First published: February 18, 2020, 3:11 PM IST

ताज्या बातम्या