Home /News /maharashtra /

Umesh kolhe murder case : दिवसभरात NIA चे 17 ठिकाणी छापे, आरोपींचे मोबाईल, सिम कार्ड जप्त, महत्त्वाची माहिती समोर येणार?

Umesh kolhe murder case : दिवसभरात NIA चे 17 ठिकाणी छापे, आरोपींचे मोबाईल, सिम कार्ड जप्त, महत्त्वाची माहिती समोर येणार?

अमरावतीचे (Amravati) पशुवैद्यकीय औषधी व्यावसायिक उमेश कोल्हे यांच्या हत्या (Umesh Kolhe Murder Case) प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात NIA कडून प्रचंड जलद गतीने तपास सुरु आहे.

अमरावती, 6 जुलै : अमरावतीचे (Amravati) पशुवैद्यकीय औषधी व्यावसायिक उमेश कोल्हे यांच्या हत्या (Umesh Kolhe Murder Case) प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात NIA कडून प्रचंड जलद गतीने तपास सुरु आहे. या प्रकरणाता छडा लावण्यासाठी NIA च्या अधिकाऱ्यांनी सात आरोपींना पकडल्यानंतर आज तब्बल 17 ठिकाणी छापे मारल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये आरोपींच्या घरांचा देखील समावेश आहे. एनआयएला संशय येणाऱ्या प्रत्येक ठिकाणी छापा टाकून पाहणी केली जात आहे. विशेष म्हणजे एनआयएने आज छापा टाकलेल्या ठिकाणांवरुन आरोपींचे सिम कार्ड, मोबाईल, आणि मेमरी कार्ड जप्त करण्यात आले आहेत. उमेश कोल्हे यांची हत्या झाल्यानंतर NIA ने संपूर्ण तपास आपल्याकडे घेतला आणि आज दुपारी एक वाजताच्या सुमारास अटक करण्यात आलेले सातही आरोपींची वैद्यकीय तपासणी करून मुंबईला रवाना करण्यात आले. त्यानंतर मात्र NIA च्या टीमने आरोपींच्या घरासह ते ज्या ज्या ठिकाणी वास्तव्यास राहत होते अशा सतरा ठिकाणी छापे मारले. त्या ठिकाणाहून मोबाईल, सिम कार्ड, मेमोरी कार्ड यासह अनेक वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. नेमकं प्रकरण काय? उमेश कोल्हे 21 जून रोजी रात्री 10 ते 10.30 दरम्यान त्यांचे 'मेडिकल स्टोर' बंद करून घरी जात असताना त्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. त्यावेळी उमेश कोल्हे यांचा मुलगा संकेत त्याची पत्नी वैष्णवीसोबत दुसऱ्या बाईकवर होता. मुलगा संकेतनं दिलेल्या तक्रारीनुसार 'मोटारसायकलीवरून आलेल्या दोन जणांनी अचानक माझ्या वडिलांची बाईक अडवली आणि त्यांनी वडिलांची गळ्यावर चाकूनं हल्ला केला. त्यावेळी त्यांच्या गळ्यातून बरंच रक्त वाहत होतं. मी माझी गाडी थांबवली आणि मदतीसाठी लोकांना ओरडून विनंती केली. त्यावेळी अन्य एक जण आला आणि त्यासोबत दोन्ही मारेकरी मोटारसायकलीवरून फरार झाले. मी आजूबाजूच्या लोकांच्या मदतीनं वडिलांना हॉस्पिटलमध्ये नेले. हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अमरावती शहर पोलिसांमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार 'अटक करण्यात आलेल्या पाच आरोपींनी दिलेल्या कबुलीनुसार, त्या सर्वांना आणखी एका आरोपीनं मदत केली होती. त्यानं या आरोपींना पळून जाण्यासाठी एक कार आणि 10,000 रूपये दिले होते.' (शिवसेना पाठोपाठ काँग्रेसमध्ये मोठी धुसफूस, तब्बल सात आमदारांवर कारवाई होणार?) मुख्य सूत्रधाराला 7 जुलै पर्यंत पोलीस कोठडी दरम्यान, उमेश कोल्हे यांच्या निर्घृण हत्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार शेख इरफान शेख रहीम ऊर्फ इरफान खान याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्याला शनिवारी रात्री नागपुरातून अटक करण्यात आली होती. आरोपीला अमरावती जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करताना अत्यंत गोपनीयता पाळण्यात आली. यावेळी न्यायालय परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलीस बंदोबस्तात आरोपीला नेण्यापूर्वी राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या पथकाने कोतवाली पोलीस ठाण्यात चौकशी केली. न्यायालयाने इरफानला येत्या 7 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. पोलिसांनी इरफानला या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार मानले आहे. याआधी पोलिसांनी मुदस्सीर अहमद ऊर्फ सोनू रजा शेख इब्राहिम (22), शाहरुख पठाण ऊर्फ बादशाह हिदायत खान (25), अब्दुल तौफिक ऊर्फ नानू शेख तस्लिम (24), शोएब खान ऊर्फ भुऱ्या साबीर खान (22), अतिब रशीद आदिल रशीद (22) आणि युसूफ खान बहादूर खान (44) या आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणाचा तपास एनआयए करत आहे.
Published by:Chetan Patil
First published:

Tags: Crime, Murder

पुढील बातम्या