बुलडाणा, 3 मार्च : पाचवीच्या वर्गात शिकणाऱ्या तीन विद्यार्थ्यांना 200 उठाबशा काढायला लावण्याची अघोरी शिक्षा एका जिल्हा परिषद शाळेतील शिक्षिकेनं दिली होती. या घटनेचं गांभीर्य 'News 18 लोकमत'ने समाजासमोर आणल्यानंतर प्रशासनाने याची गंभीर दखल घेत मनीषा शेंबळे या शिक्षिकेला निलंबित केलं आहे.
मुलांना अघोरी शिक्षा देण्यासंबंधी गटशिक्षणाधिकारी यांना चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानंतर त्यांनी संबंधित विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन प्रकृतीची विचारपूस करून तसा अहवाल शिक्षणाधिकारी यांना पाठवला. त्यावरून संबंधित शिक्षिकेला तात्काळ निलंबित करण्यात आले आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?
बुलडाणा जिल्ह्यातील एका जिल्हा परिषद शाळेतील शिक्षिकेने विद्यार्थ्याला अघोरी शिक्षा केल्याचं प्रकरण समोर आलं. हा मुलगा 5व्या वर्गात शिकत असून या शिक्षेमुळे तो आजारी पडला आहे. ओम देवेंद्र तळपते असं त्या मुलाचं नाव आहे. शेगाव तालुक्यातल्या तालुक्यातील पहुरजीरा येथील जि. प शाळेत हा प्रकार घडला. अशी शिक्षा करणाऱ्या शिक्षिकेवर तातडीने कारवाई करावी अशी मागणी पालकांनी अधिकाऱ्यांकडे केली होती.
हेही वाचा- मुंबईत हत्येचा भयंकर प्रकार, मोबाइल चार्जरची वायर तुटेपर्यंत आवळला मुलाचा गळा
ओम हा पहुरजीरा इथल्या जि. प. शाळेत शिकतो. तो 5 व्या वर्गात आहे. ओम हा धिंगाणा घालतो, गोंधळ करतो त्यामुळे शिक्षिका मनिषा शेंबडे यांनी त्याला 200 उठाबशा काढण्याची शिक्षा केली. त्या शिक्षेची अंमलबजावणी करताना लहानगा ओम चांगलाच भेदरून गेला. या शिक्षेचा त्याला त्रास झाल्याने तो आजारी पडला.
पालकांनी जेव्हा त्याला कारण विचारलं तेव्हा त्याने सगळी घटना सांगितली. त्यानंतर त्याच्या पालकांनी लेखी तक्रार शिक्षण अधिकारी आणि इतरांकडे केली. या शिक्षिकेविरुद्ध तातडीने कारवाई करावी अशी मागणी या पालकांनी केली होती. ओम वर सध्या उपचार सुरु आहे.
हसत-खेळत दिलेलं शिक्षण हे सर्वात योग्य असते. त्यामुळेच विद्यार्थी जास्त चांगल्या पद्धतीने ग्रहण करतात असं सांगितलं जातं. मात्र असं सातत्याने सांगितलं जात असतानाच हा प्रकार समोर आल्याने पालकांनाही धक्का बसला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.